लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागण्याआधी सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्यात नाहीतर आम्हाला लोकसभा निवडणूक लढवण्याशिवाय पर्याय उरणार नाही असा आक्रमक पवित्रा मराठा क्रांती मोर्चाने घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज मुंबईत पत्रकार परिषद घेण्यात आली. पहिल्या टप्प्यात ज्या मागण्या करण्यात आल्या आहेत त्या आचारसंहिता लागण्यापूर्वी मान्य कराव्यात अशी मागणीही करण्यात आली आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यात मुंबई आणि ठाणे या ठिकाणी जे उमेदवार आहेत त्यांची नावं आज पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली.

मराठा क्रांती मोर्चा पुरस्कृत अपक्ष उमेदवारांची नावं

स्नेहा रविंद्र कुऱ्हाडे – ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ
विनोद पोखरकर- ठाणे लोकसभा मतदारसंघ
सुहास बागल- उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ

ही पहिल्या यादीतील नावं आहेत. आम्ही सरकारला यासंदर्भातलं पत्र दिलं होतं मात्र आमच्या पत्रव्यवहाराचं उत्तर देण्याचीही तसदी या सरकारने घेतली नाही. त्यामुळे आम्ही लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे पत्रकार परिषदेत विनोद पोखरकर यांनी जाहीर केले.

काय आहेत पहिल्या टप्प्यातील प्रमुख मागण्या?

मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे मराठा आंदोलनादरम्यान आत्मबलिदान दिलेल्या बांधवांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत तसेच कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी द्यावी

आश्वासन दिल्याप्रमाणे आंदोलना दरम्यान मराठा युवकांवर दाखल झालेले खोटे गुन्हे सरसकट त्वरित मागे घ्यावेत

कोपर्डी खटल्यातील आरोपींना सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेची त्वरित अंमलबजावणी होण्यासाठी या खटल्यात उज्जवल निकम यांची नेमणूक करून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर अनुसूचित जाती व जमाती प्रतिबंधक कायद्याचा गैरवापर थांबावा यासाठी मुंबई मोर्चाच्या वेळी आपण पाच सदस्यीय समिती जिल्हा पातळीवर नेमण्याचं आश्वासन दिलं होतं त्याची पूर्तता करावी

मराठा समाजातील युवकांना रोजगार प्रशिक्षण मिळावं आणि त्यातून त्यांच्या हाताला काम मिळावं यासाठी बार्टीच्या धर्तीवर सारथी सुरू करण्यात आलं आहे या संस्थेला आपण जाहीर केल्याप्रमाणे जो निधी आहे तो वर्ग करावा तसेच पहिल्या टप्प्यात प्रमुख शहरांमध्ये सारथीच्या माध्यमातून काम सुरु करावं आणि विधानसभा निवडणुकांच्या आधी उर्वरित जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या टप्प्यातील सारथी संस्थेच्या प्रशिक्षण कार्यालयाचा प्रश्न मार्गी लावावा

मराठा समाजातील मुला-मुलींच्या शिक्षणासाठी सरकारने प्रत्येक जिल्ह्यात तसेच महानगरपालिका क्षेत्रात कायमस्वरूपी वसतिगृह बांधण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यासाठी पाच कोटींच्या निधीचीही घोषणा करण्यात आली. मात्र दीड वर्ष उलटूनही हे आश्वासन पूर्ण झालेलं नाही, एकाही ठिकाणी वसतिगृहाचं बांधकामही सुरु करण्यात आलेलं नाही. तसेच त्यासाठी जागाही निश्चित करण्यात आलेली नाही. पहिल्या टप्प्यात किमान प्रमुख शहरांमध्ये मराठा समाजाच्या वसतिगृहांसाठी जागा अधिग्रहित करण्यात यावी आणि तिथे बांधकाम सुरु करण्यात यावं.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपैकी बहुतांश शेतकरी मराठा-कुणबी, कुणबी-मराठा असून आरक्षण, शेतमालाला हमीभाव मिळत नाही. अनेकदा अपुरा पावसामुळे पिकं जळून जातात. यातच शेतकरी कर्जबाजारी होतो त्यातून आजवर राज्यात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्याची कर्जमाफी आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करणं ही मागणी करण्यात आली आहे. कर्जमाफी काही प्रमाणात झाली, मात्र अनेक शेतकरी आजही कर्जमाफीपासून वंचित आहेत त्यांना लवकरात लवकर कर्जमाफी करण्यात यावी.

या सगळ्या मागण्यांचं एक पत्र मराठा क्रांती मोर्चाने मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत विनोद पोखरकर यांनी ही माहिती दिली. आता यावर सरकार काय निर्णय घेणार हे पहाणे महत्त्वाचे आहे.