वर्षांकाठी ५२८ कोटींचा तोटा, शिवनेरीसारख्या वातानुकूलित प्रकल्पाकडे प्रवाशांनी फिरविलेली पाठ, महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या ‘लाल परी’चा डळमळता डोलारा अशा केविलवाण्या अवस्थेतून तग धरण्यासाठी धडपडणाऱ्या एसटी महामंडळाने खासगी क्षेत्रातील सात मातब्बर कंपन्यांना सोबत घेऊन अमलात आणलेले ‘शिवशाही’ नावाचे दोन हजार आलिशान बसगाडय़ांचे स्वप्न महामंडळाचा डोलारा सावरण्यासाठी आधार देणार का, अशी कुजबुज महामंडळातील संपकरी कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे.

‘शिवशाही’ हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वप्न होते. राज्य सरकारने महामंडळाच्या या योजनेस मान्यता दिल्यानंतर ठाकरे यांच्या स्वप्नपूर्तीसाठी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी कंबर कसली, आणि गेल्या जूनमध्ये ‘शिवशाही’ची पहिली बसगाडी अवतरली. खासगी प्रवासी वाहतूक क्षेत्राने अगोदरच एसटी महामंडळास आव्हान दिलेले असताना, खासगी क्षेत्रातील तगडय़ा प्रतिस्पध्र्यानाच सोबत घेऊन प्रकल्प राबविण्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र, खासगीकरणास महामंडळाचा विरोधच असून भाडेतत्त्वावरील या गाडय़ा महामंडळच चालविणार आहे, असा एसटीचा दावा आहे. खासगी क्षेत्रातील सात वाहतूकदारांकडून ‘शिवशाही’च्या बसगाडय़ा भाडय़ाने घेण्यात येणार असून किलोमीटरमागे ठरावीक भाडे देऊन महामंडळ त्या गाडय़ा चालविणार आहेत. या गाडय़ांचा चालक (म्ड्रायव्हर) खासगी वाहतूकदारांचा तर वाहक (कंडक्टर) मात्र महामंडळाचा असेल. येत्या वर्षअखेरीस अशा १२०० शिवशाही बसगाडय़ा महामंडळात दाखल होतील, त्यातील सुमारे ७०० गाडय़ा खासगी वाहतूकदारांच्या ताफ्यातील असतील. उर्वरित ५०० गाडय़ा महामंडळाच्या मालकीच्या असतील, असे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांनी सांगितले. खासगी क्षेत्रातील वाहतूक व्यवस्था महामंडळाच्या तुलनेत अधिक कार्यक्षम असल्याचे स्पष्ट झाल्याने, ‘शिवशाही’साठी खासगी क्षेत्राचा सहभाग घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे देओल म्हणाले.

महामंडळाच्या ताफ्यातील १८ हजार ७०० बसगाडय़ांपैकी दररोज सुमारे १६ हजार ८०० बसगाडय़ा प्रत्यक्ष रस्त्यावर धावत असतात. २०१४-१५ ते २०१६-१७ या कालावधीत एसटी महामंडळाच्या दैनंदिन प्रवाशांची संख्या मात्र सुमारे दोन लाखांनी घटली. २०१४-१५ मध्ये एसटीच्या दैनंदिन प्रवाशांची संख्या ६७.२८ लाख एवढी होती. २०१६-१७ मध्ये ही संख्या ६५.३१ लाखांपर्यंत घटली. दुसरीकडे खासगी वाहतूक क्षेत्राला मात्र, सुगीचे दिवस दिसत होते. खासगी वाहतूकदारांपासून प्रवाशांना  परावृत्त करण्यासाठी महामंडळाने जगजागृती मोहिमा राबविल्या, जाहिरातींवरही पैसे खर्च केले. मात्र, एसटीचे नशीब फारसे उजळलेच नाही. सध्या ‘शिवशाही’च्या केवळ ४२ गाडय़ा रस्त्यावर आल्या असून महामंडळाचा डोलारा सावरण्यासाठी त्या उपकारक ठरणार किंवा नाही, हे ठरविणे सध्या तरी शक्य नाही, असे महामंडळातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

महामंडळाने प्रसन्ना, पर्पल मोबिलिटी, जय एजन्सी, बाफना, रेन्बो ट्रॅव्हल्स, आरून ट्रॅव्हल्स, श्रीकृपा, भागीरथी या खासगी वाहतूकदारांसोबत शिवशाही राबविण्याचा करार केला असून येत्या डिसेंबरअखेरीपर्यंत सुमारे १२०० गाडय़ा महामंडळाच्या व्यवस्थेतून रस्त्यावर धावू लागतील. त्यापैकी ७०० गाडय़ा खासगी वाहतूकदारांकडून भाडेतत्त्वावर घेतल्या जातील. मात्र, या कंपन्यांचे प्रवर्तक कोण याविषयी माहिती देण्यास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी असमर्थता दर्शविली.