News Flash

पाच रुपयांत जेवण

१०-१२ महिला एकत्र आल्या आणि त्यांनी माटुंग्यातील निरंजन पारेख मार्गाजवळ ९ मे पासून ‘राज रोटी सेंटर’ सुरू केले आहे.

गरजूंसाठी वडाळ्यातील महिला एकत्र
मुंबई शहरात अनेक गरजू भुकेल्या अवस्थेत दिवस-रात्र घालवीत असतात. अनेक जण असे आहेत ज्यांना दिवसातून एकदाच जेवण मिळत असते, तर काहींच्या नशिबी तेसुद्धा मिळणे कठीण असते, मात्र अशा लोकांची गरज ओळखून वडाळ्यातील १०-१२ महिला एकत्र आल्या आणि त्यांनी माटुंग्यातील निरंजन पारेख मार्गाजवळ ९ मे पासून ‘राज रोटी सेंटर’ सुरू केले आहे.
वडाळ्यात राहणाऱ्या या महिला एकत्र येऊन स्वखर्चाने वृद्ध, शारीरिक अपंग आणि ज्यांचे मासिक उत्पन्न ७००० रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल अशा लोकांसाठी दुपारी ११ ते १ या वेळेत हे केंद्र सुरू केले आहे. फक्त पाच रुपयांत या ठिकाणी गरजूंसाठी सहा पोळ्या, १२५ ग्रॅम भाजी आणि १ केळे देण्यात येते. यासाठी त्यांना श्रीमद् राजचंद्र आत्म तत्त्व रिसर्च सेंटरची चांगली साथ लाभली. सुरुवातीला डॉ. मीना गोशर आणि हिरा शहा यांच्या मनात ही संकल्पना आली, त्यानंतर स्वयंसेवक म्हणून त्यांच्या सोबत नैना मडिया, स्वाती कामदार, शिल्पा दोषी, जयश्री दोषी, प्रज्ञान दोषी, जिगला गाला, कल्पना शहा आदींनी त्यांना सहकार्य केले. तसेच श्रीमद् राजचंद्र आत्म तत्त्व रिसर्च सेंटरचीही त्यांना चांगली साथ मिळाली.
या योजनेचा फायदा योग्य लोकांनाच होण्यासाठी लाभार्थीकडून शिधापत्रक, आधार कार्ड आणि वीज बिलाची एक-एक झेरॉक्स प्रत प्रत्येकाकडून घेण्यात येत आहे, फक्त २० दिवसांत आतापर्यंत ३० लोक या योजनेचा लाभ घेत असून अजूनही अनेक जण या ठिकाणी येत आहेत.

आपण स्वत:साठी कमवतात पण दुसऱ्यांसाठी काही तरी केले पाहिजे असा विचार अनेक वेळा माझ्या मनामध्ये येत होता, अन्नदान हेच मुख्य दान असल्याने आम्ही ५ रुपयांत जेवण ही सुविधा उपलब्ध करण्याचे ठरवले. तसेच काही दिवसांनी आम्ही अशीच सेवा अंध आणि शारीरिक अपंग असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सुरू करणार आहोत.
– डॉ. मीना गोशर, रोटी सेंटरच्या प्रमुख

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2016 5:10 am

Web Title: meal for rs 5 in matunga for those in need
टॅग : Meal
Next Stories
1 इन फोकस : धोक्याचा शॉर्टकट
2 दळण आणि ‘वळण’ : भ्रष्टाचाराचें राज्य आम्हां नित्य दीपवाळी!
3 वाघ विरुद्ध सिंहाच्या वादात ‘पंजा’ची मूठ झाकलेलीच!
Just Now!
X