संस्थेच्या आजच्या निवडणुकीवर पडसादाची शक्यता
मुंबई : अभ्यासकांचे माहेरघर असलेल्या २१५ वर्षे जुन्या ‘एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई’मध्ये उपग्रंथपालाच्या नेमणुकीवरून वादाला तोंड फुटले आहे. शनिवारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि निवडणूक होत असून याचे पडसाद निवडणुकीवर पडण्याची शक्यता आहे.
यावर्षी मार्च महिन्यात एशियाटिकमध्ये उपग्रंथपालपदासाठी मुलाखती घेण्यात आल्या. मुलाखतीनंतर निवडण्यात आलेल्या उमेदवारास नेमणुकीचे पत्र देताना वर्षांला नऊ लाख ८२ हजार रुपये वार्षिक वेतन देण्याचे ठरले. मात्र त्या आधी सोसायटीतील इतर कर्मचाऱ्यांच्या वार्षिक वेतनवाढीसाठी पाच लाख रुपये निधीचा तुटवडा असल्याचे कारण देण्यात आले होते. निधीचा तुटवडा असताना उपग्रंथपालाला इतके वेतन का दिले जात आहे, असा प्रश्न उपस्थित करत कार्यकारिणी समितीच्या काही सदस्यांनी यावर आक्षेप घेतले. तसेच अध्यक्षांनी उपग्रंथपालांच्या वेतनाबाबत इतर सदस्यांना अंधारात ठेवल्याचाही सदस्यांचा आक्षेप होता. या आक्षेपांनंतर वेतन कमी करून चार लाख ७६ हजारांवर आणले.
यानंतरही वाद शमला नाही. एशियाटिकमधील कर्मचारी संघटनेने ई-मेलद्वारे संस्थेच्या सर्व सदस्यांना या प्रकाराची माहिती दिली. संस्थेकडे उपग्रंथपालच नव्हे तर ग्रंथपालाचे पदही रिक्त आहे. अनेक प्राचीन दुर्मीळ, संदर्भ ग्रंथ सांभाळण्यासाठी सक्षम व्यक्ती ग्रंथपालपदी असणे आवश्यक आहे. ते करण्याऐवजी उपग्रंथपालांना अवाच्या सव्वा वेतन दिल्याबद्दल कर्मचाऱ्यांचा आक्षेप आहे. या घडामोडींबाबत एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईचे अध्यक्ष शरद काळे यांनी प्रतिक्रियेस नकार दिला.