‘म्हाडा’च्या अध्यक्षपदी उदय सामंत, प्रशांत ठाकूर यांच्याकडे ‘सिडको’

गेल्या साडेतीन- चार वर्षांपासून चर्चेत असलेल्या विविध महामंडळावरील नियुक्त्यांना अखेर शुक्रवारी मुहूर्त मिळाला. विविध विकास महामंडळे, मंडळे व प्राधिकरणाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती पदांवरच्या एकूण २१ राज्य सरकारने आज जाहीर केल्या असून  महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) अध्यक्षपदी शिवसेनेचे उदय सामंत तर शहर व औद्योगिक विकास महामंडळाच्या  अध्यक्षपदी भाजपाचे प्रशांत ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अनेक आमदार तसेच पक्षातील काही ज्येष्ठ कार्यकर्ते महामंडळांच्या नियुक्त्यांकडे डोळे लावून बसले होते. मात्र कधी दोन्ही पक्षात एकमत होत नव्हते तर कघी पक्षांर्तगत वादामुळे  गेली तीन वर्षांहून अधिक  काळापासून हा नियुक्त्यांचा घोळ रखडला होता. अखेर आज विविध २१ महामंडळावरील पदाधिकाऱ्यांच्या नियुत्या करण्यात आल्या आहेत. त्यात पक्षात नव्याने आलेल्या तसेच पुढील निवडणुकीत प्रभावी कामगिरी करण्याची अपेक्षा असलेल्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. पनवेल महापालिकेत एकहाती सत्ता आणून मुख्यमंत्र्यांची वाहवा मिळविणारे आमदार प्रशांत ठाकूर यांना सिडकोच्या अध्यक्षपदाची बक्षिसी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांना आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करून त्यांच्यासाठी भाजपाने पक्षाचे दरवाजे खुले केले आहेत.

शिवसेनेने मुंबई आणि कोकणातील आपली ताकद वाढविण्यावर भर दिला आहे. मनसेतून आलेले हाजी अरफात शेख यांच महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी तर जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बाळासाहेब ज्ञानदेव पाटील यांची कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या सभापतीपदी, हाजी एस. हैदर आझम यांची मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी तर सदाशिव दादासाहेब खाडे यांची पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी संजय उर्फ संजोय मारुतीराव पवार, माजी आमदार आशिष जयस्वाल यांची महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाच्या अध्यक्षपदी, प्रकाश नकुल पाटील यांची महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षप  नितिन संपतराव बानगुडे-पाटील यांची तर जगदीश भगवान धोडी यांची कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीमती ज्योती दीपक ठाकरे यांची महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी, विनोद घोसाळकर यांची मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या सभापतीपदी, माजी सनदी अधिकारी विजय नाहटा यांची मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाच्या सभापतीपदी, रघुनाथ बबनराव कुचिक यांची महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी, मधु चव्हाण यांची  मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या अध्यक्षपदी,संदिप जोशी यांची महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी तर मो. तारिक कुरैशी यांची नागपूर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या अध्यक्षपदी आणि राजा उर्फ सुधाकर  सरवदे यांची महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.