मनसेने चोप दिल्यानंतर आणि माफी मागत नाही तोवर दुकान उघडू देणार नाही असा इशारा दिल्यानंतर या मुंबईतल्या कुलाबा येथील महावीर ज्वेलर्स चालवणाऱ्या सराफाने लेखिका शोभा देशपांडे यांची माफी मागितली आहे. माझ्याशी मराठीत बोला असा आग्रह धरल्याने लेखिका शोभा देशपांडे यांना या सराफाने हीन वागणूक दिली तसंच दोन महिला पोलिसांच्या मदतीने दुकानाबाहेर ढकलून दिलं अशा आरोप लेखिका शोभा देशपांडे यांनी केला. एवढंच नाही तर त्या काल दुपारी २ वाजल्यापासून या दुकानाबाहेर ठिय्या आंदोलन करत होत्या. या प्रकरणात आज मनसेने खळ्ळं खट्याक केल्यानंतर मुजोर सराफाने अखेर लेखिका शोभा देशपांडे यांची माफी मागितली. सुमारे २१ तासांपेक्षा जास्त काळानंतर मराठी लेखिका शोभा देशपांडे यांचं मुंबईतलं ठिय्या आंदोलन संपलं आहे. त्यांना उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास असल्याने रुग्णालयात नेण्यात आलं आहे.
काय आहे प्रकरण?
लेखिका शोभा देशपांडे या गुरुवारी दुपारी कुलाबा परिसरातील महावीर ज्वेलर्स या ठिकाणी गेल्या होत्या. दुकानातील व्यक्ती त्यांच्याशी हिंदीतून बोलत होते. त्यांनी मराठीतून बोलावं अशी विनंती शोभा देशपांडे यांनी केली. तसंच दुकानाचा परवाना दाखवा असंही सांगितलं मात्र त्यांनी मराठीत बोलण्यात नकार तर दिलाच शिवाय दागिने देण्यासही नकार दिला. तसंच पोलिसांच्या मदतीने दुकानाबाहेर ढकलून दिलं असा आरोप शोभा देशपांडे यांनी केला. मिळालेल्या या अपमानास्पद वागणुकीनंतर लेखिका शोभा देशपांडे यांनी गुरुवारी दुपारी २ वाजल्यापासून या दुकानाबाहेरच ठिय्या आंदोलन केलं होतं. दुकानदार येऊन जोवर दुकानाचं लायसन्स (परवाना) दाखवत नाही तोवर आपण आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली होती. दरम्यान आज सकाळी मनसेचे नेते संदीप देशपांडे या ठिकाणी आले आणि त्यांनी लेखिका शोभा देशपांडे यांची भेट घेतली. त्यानंतर दुकानदाराला मनसे स्टाइल दणका दाखवल्यानंतर या मुजोर सराफाने शोभा देशपांडे यांचे पाय धरले आहेत.
हे ही वाचा: मराठीत बोलण्याची मागणी केल्याने मुंबईतल्या सराफाने दुकानाबाहेर ढकललं, लेखिकेचा रस्त्यावर ठिय्या
संदीप देशपांडे यांनी काय म्हटलं आहे?
लेखिका शोभा देशपांडे यांनी ग्राहक म्हणून मराठीत बोला ही केलेली मागणी मुळीच चुकीची नाही. मात्र त्यांना दुकानदाराने जी वागणूक दिली ती फक्त चुकीची नसून निषेधार्ह आहे. एवढंच नाही तर पोलिसांनीही या प्रकरणात असंवेदनशीलता दाखवली. घरात बसलेल्या सरकारला याची जाणीव आहे का? असाही टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना दाखवला. एवढंच नाही तर महावीर ज्वेलर्सच्या सराफाने माफी मागितली आहे. पण अद्यापही परवाना दाखवलेला नाही. तो परवाना दाखवत नाही तोपर्यंत दुकान उघडू शकणार नाही याची काळजी मनसे घेईल असाही इशारा त्यांनी दिला आहे.