राज्यात सलग दुसऱ्या दिवशी ४०० हून अधिक करोना बळींची नोंद झाली. गेल्या २४ तासांत करोनामुळे ४५९ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण करोनाबळींची संख्या ३४,३४५ वर पोहोचली आहे.

राज्यात गुरुवारी करोनाचे १९,१६४ रुग्ण आढळले. पुणे आणि नागपूरमधील रुग्णसंख्या अद्यापही आटोक्यात आलेली नाही. दिवसभरात राज्यात १७,१८४ रुग्ण करोनामुक्त झाले. उपचाराधीन रुग्णांची संख्या २ लाख ७४ हजार असून, त्यातील सर्वाधिक रुग्ण पुण्यातील आहेत.

देशातील रुग्णसंख्या ५७ लाखांवर

* गेल्या २४ तासांत करोनाचे ८६,५०८ रुग्ण आढळले. त्यामुळे देशाची एकूण रुग्णसंख्या ५७,३२,५१८ वर पोहोचली आहे.

* दिवसभरात १,१२९ करोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत मृतांची संख्या ९१,१४९ झाली आहे. मृतांचे हे प्रमाण १.५९ टक्के आहे.

* देशभरात ४६,७४,९८७ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. हे प्रमाण ८१.५५ टक्के आहे.

* देशात ९,६६,३८२ रुग्णांवर उपचार सुरू असून, हे प्रमाण १६.८६ टक्के आहे.

एकनाथ शिंदे करोनाबाधित

नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना करोनाची लागण झाली आहे. गेल्या काही दिवसांत आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी करोनाची चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही शिंदे यांनी ट्वीटद्वारे केले आहे.