वातानुकूलित आणि बिगर वातानुकूलित बस टप्प्याटप्याने सेवेत

कधी काळी एसटी प्रवाशांसाठी आरामदायी प्रवासाचे साधन असलेल्या रातराणीचे रूप बदलत असून तब्बल २५० स्लीपर बस टप्प्याटप्प्याने दाखल होणार आहेत. यातील १५० बस वातानुकूलित असून १०० बिगर वातानुकूलित बसची बांधणी राज्य परिवहन महामंडळ करणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त  एसटी महामंडळाच्या मुंबई सेन्ट्रल येथील मुख्यालयात राष्ट्रीय कृतज्ञता दिवस आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वातानुकूलित स्लीपर बसचे उद्घाटन करण्यात आले.

राज्यात मोठय़ा प्रमाणात धावणाऱ्या खासगी बसमुळे एसटी महामंडळाचे उत्पन्न बुडते. या प्रवाशांना पुन्हा आपल्याकडे वळविण्यासाठी महामंडळाने वातानुकूलित बस दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

जवळपास दोन हजार वातानुकूलित शिवशाही बस दाखल केल्या जात असून यामध्ये स्लीपर बसचाही समावेश करण्यात आला आहे. सुरुवातीला १५० बस टप्प्याटप्यात सहा महिन्यात दाखल होतील. या बस रातराणी म्हणूनच चालविण्यात येतील. ५०० किलोमीटरपेक्षा आणि आठ किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास असलेल्या मार्गावर बस चालवण्यात येणार आहेत. या बसची संख्या हळूहळू वाढविण्यात येईल.

पनवेलमध्ये बस तळ तर आगार स्तरावर निवासी संकुल

* मुंबईत एसटी कर्मचाऱ्यासाठी निवासी संकुल उभारण्याची योजना असतानाच आता सर्व आगार स्तरावर निवासी संकुल उभारण्याची योजना प्रस्तावित.

* एसटीकडून गडचिरोली, पालघर, शहादा नंदुरबार अशा चार ठिकाणी आदिवासी युवकांसाठी चालक प्रशिक्षण केंद्र

* नवीन रंगसंगती असलेल्या परिवर्तन बसचे उद्घाटन

* पनवेल बस तळ बांधण्यात येणार असून त्याचे भूमिपूजन करण्यात आले. ३३ फलाटांची बस स्थानक, चालक-वाहक विश्रांतिगृह, प्रवाशांसाठी प्रतीक्षालय इत्यादी सुविधा असतील. दोन वर्षांंत तळ बांधण्यात येईल

शरण आलेल्या नक्षलयुवकांना नोकरी

शरण आलेल्या  ६५ नक्षली युवकांना समाजाच्या मूळ प्रवाहामध्ये सामावून घेण्यासाठी एसटी महामंडळामध्ये विविध पदावर नियुक्तीची योजना जाहीर करण्यात आली. चालक, वाहक आणि कर्मचारी म्हणून त्यांची नियुक्ती केली जाईल, अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी सांगितले.