ढगाळ हवामान, काही ठिकाणी झालेला तुरळक पाऊस यामुळे मुंबईच्या कमाल तापमानात शुक्रवारी अचानक पाच अंशांची घट झाली. मात्र गुरुवारी तीन अंशाने वाढलेल्या किमान तापमानात बदल झाला नाही.

अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गुरुवार आणि शुक्रवार दोन्ही दिवस मुंबईत ढगाळ हवामान राहिले. परिणामी गुरुवारी कमाल तापमानात तीन अंश घट झाली, पाठोपाठ शुक्रवारी आणखी पाच अंशांची घट होऊन २८.८ अंश तापमान नोंदविण्यात आले. मोसमात प्रथमच मुंबईचे कमाल तापमान ३० अंशांखाली गेले आहे. शुक्रवारी पहाटे मुंबई आणि परिसरात किरकोळ पावसाचा शिडकावा झाला. मुंबई शहर आणि उपनगरे, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात शुक्रवारी एक ते पाच मिमी पावसाची नोंद झाली. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रावर १.४ मिमी, सांताक्रूझ केंद्रावर ०.७ मिमी पावसाची नोंद झाली.

पावसाची शक्यता

अरबी समुद्रातील घडामोडींमुळे शनिवारी कोकण किनारपट्टीवर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्य़ात आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तर धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्य़ात मेघगर्जनेसह गारा पडण्याची शक्यता आहे.

मच्छीमारांचे नुकसान

पालघर, डहाणू, वसई तालुक्यात अनेक ठिकाणी पडलेल्या पावसामुळे येथील शेतकरी, मच्छीमार, वीटभट्टी, गवत व्यावसायिक मोठे नुकसान झाले .  मच्छीमारांनी वाळत टाकलेली मासळी खराब झाल्याने फेकून द्यायची वेळ त्यांच्यांवर आली आहे. शेतकऱ्यांचे कापणी केलेले मात्र न झोडलेले भात भिजल्याने नुकसान झाले आहे. गवत, पावळी भिजून गेली आहे.