आदल्या परीक्षांचा घोळ अद्याप पूर्णपणे निस्तरला नसताना आता मुंबई विद्यापीठाला पुढील परीक्षांचे वेध लागले आहेत. विद्यापीठाच्या या सत्राच्या परीक्षा मार्च अखेरपासून सुरू होणार आहेत. आधीच्या परीक्षांचे लांबलेले निकाल, कोलमडलेले वेळापत्रक यांमुळे या सत्रात अनेक अभ्यासक्रमांसाठी अध्ययनासाठी महाविद्यालयांना वेळच मिळालेला नाही.

मुंबई विद्यापीठाने चार विज्ञान-तंत्रज्ञान, वाणिज्य आणि व्यवस्थापन, आंतरविद्याशाखा आणि मानवविज्ञान या चारही विद्याशाखांमधील ४६५ परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यातील महाविद्यालयाच्या स्तरावर होणाऱ्या प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांच्या बहुतेक परीक्षा या २० मार्चपासून सुरू होणार आहेत. औषधनिर्माणशास्त्र, विज्ञान पदवी, वाणिज्य, कला पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा मार्चच्या शेवटच्या आठवडय़ात सुरू होत आहेत.

अध्यापनास अपुरा वेळ

गेल्या वर्षी उत्तरपत्रिकांचे ऑनलाइन मूल्यांकन करण्यात झालेल्या गोंधळाने विद्यापीठाचे शैक्षणिक वेळापत्रक यंदापुरते कोलमडून गेले. लांबलेल्या निकालामुळे पहिले सत्र उशिरा सुरू झाले, परिणामी पहिल्या सत्राच्या परीक्षा, निकाल यांचेही वेळापत्रक विस्कळीत झाले. विद्यापीठाच्या गेल्या सत्राच्या परीक्षांचे निकाल गेल्या आठवडय़ात जाहीर झाले आहेत. आधीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यावर जेमतेम महिन्याभरात पुढील सत्राच्या परीक्षेला बसण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. सत्र उशिरा सुरू झाल्यामुळे शिकवण्यासाठी पुरेसा वेळही मिळाला नसल्याचे शिक्षकांकडून सांगण्यात येत आहे.

या वेळी परीक्षा वेळेवर सुरू करून, परीक्षांचे निकाल वेळावर जाहीर करण्यासाठी विद्यापीठाचे प्राधान्य राहील.

      – डॉ. अर्जुन घाटुळे,  संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ