‘एमयूटीपी- २ आणि एमयूटीपी-३’मधील प्रकल्प धिम्या मार्गावर

मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर एमयूटीपी-२ आणि एमयूटीपी-३चे प्रकल्प सुरू असून या प्रकल्पांना अद्यापही गती मिळालेली नाही. यामध्ये ठाणे ते दिवा आणि सीएसएमटी ते कुर्ला पाचवा-सहावा मार्ग, याचबरोबर हार्बरवरील अंधेरी ते गोरेगावपर्यंत विस्तार, कळवा-ऐरोली लिंक रोड इत्यादींचा समावेश आहे. गेल्या अर्थसंकल्पात एमआरव्हीसीच्या एमयूटीपी-२ आणि ३ मधील प्रकल्पांसाठी आणखी निधीही मंजूर झाला. परंतु प्रकल्प धिम्या ट्रॅकवरच आहेत. तब्बल ६३६ कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. यापैकी ४११ कोटी एमयूटीपी-३ आणि १३७ कोटी एमयूटीपी-२ साठी होते.

एमयूटीपी-३

गेल्या अर्थसंकल्पात एमयूटीपी-३ मधील प्रकल्पांसाठी केंद्राने ४११ कोटी रुपयांची तरतूद केली होती. विशेष म्हणजे राज्य सरकारही एवढाच निधी देणार असल्याने ही रक्कम ८२२ कोटी रुपये एवढी असल्याचे सांगितले गेले. एमयूटीपी-३ मध्ये वसई-विरार चौपदरीकरण, पनवेल-कर्जत उपनगरीय दुहेरी मार्गिका, कळवा-ऐरोली उन्नत जोडमार्ग या मोठय़ा प्रकल्पांबरोबरच नवीन गाडय़ा आणि रेल्वेरूळ ओलांडण्यास प्रतिबंध यांचाही समावेश आहे. परंतु यातील एकाही प्रकल्पाला गती मिळालेली नाही.

सीवूड-उरणलाही गती

नवी मुंबईला जोडणारा सीवूड ते उरण प्रकल्प गेल्या काही वर्षांत रखडला. मात्र त्याला आता गती देण्यात येत असून यातील खारकोपर स्थानकापर्यंतचा पहिला टप्पा लवकरच सुरु करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी गेल्या अर्थसंकल्पात ६६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.

एमयूटीपी-२

एमयूटीपी-२ प्रकल्पातील कामे २००८ सालापासून सुरू करण्यात आली. यातील दिवा ते ठाणे पाचवी-सहावी मार्गिका, सीएसटी ते कुर्ला पाचवी-सहावी मार्गिका आणि अंधेरी-गोरेगाव हार्बर मार्गाचा विस्तार हे तीन प्रकल्प अजूनही पूर्ण झालेले नाहीत. या योजनेसाठी १३७ कोटी रुपयांची तरतूद गेल्या वर्षांच्या रेल्वे अर्थसंकल्पात करण्यात आली होती. या निधीला राज्य सरकारकडून येणाऱ्या १३७ कोटी रुपयांची जोड मिळाली. तरीही जमिनींवर अतिक्रमण, अधिग्रहणाचा प्रश्न आणि अन्य तांत्रिक अडचणींमुळे प्रकल्प रखडले. गोरेगाव हार्बर मार्ग आता तयार झाला असला तरी रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून त्याला मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे जानेवारी २०१८ मध्ये सेवेत येणारा प्रकल्पाला विलंब झाला आहे. सीएसटी ते कुर्ला पाचवी-सहाव्या मार्गिकेचे काम तर सुरूही झालेले नसून दिवा ते ठाणे पाचवा-सहावा मार्गाचे काम गेली अनेक वर्षे सुरूच आहे.

अन्य प्रकल्प

कल्याण-कसारा यांदरम्यान तिसऱ्या मार्गिकेचे काम २०१६ मध्ये सुरू झाले. अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी तब्बल ७० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. प्रकल्पातील पूल उभारणी, जमीन हस्तांतरण आदी कामे म्हणावी तशी वेगाने सुरू नाहीत. याशिवाय पनवेल टर्मिनसचे काम सुरू असून कल्याण टर्मिनसला मुर्त रूप मिळालेले नाही. तर लोकल गाडय़ांसाठी परळ टर्मिनस उभारले जात असून त्याच जोडीला लांब पल्ल्याच्या गाडय़ांचे आणखी एक परळ कोचिंग टर्मिनसही बांधण्याचा प्रस्ताव आहे.