विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवापेक्षा भाजप सरकारला दिलेल्या बाहेरून पाठिंब्याबद्दल पक्षात तीव्र प्रतिक्रिया उमटल्याच्या पाश्र्वभूमीवर पुढील वाटचालीबाबत विचार करण्यासाठी राष्ट्रवादीच्या निवडक नेत्यांचे दोन दिवसांचे शिबीर मंगळवारपासून अलिबागमध्ये सुरू होत आहे. भाजपबरोबर जाण्यापेक्षा पक्षाने विरोधी पक्षाची भूमिका बजावावी, असा मतप्रवाह असून यावर चर्चा होणार आहे.

पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते, खासदार-आमदार व काही पदाधिकारी अशा फक्त २०० निवडक नेत्यांना शिबिरासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली जाईल. सर्व नेतेमंडळींना सोमवारी रात्रीच अलिबागमध्ये पोहोचण्याची सूचना करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत पक्ष चौथ्या क्रमांकावर फेकला गेला याची राष्ट्रवादीच्या नेत्यांना जास्त चिंता आहे. जनतेने नाकारूनही भाजप सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याच्या निर्णयाची पक्षात तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.

पाठिंब्यावरून अस्वस्थता
राष्ट्रवादीने निधर्मवाद आणि सर्व जातीजमातींना सामावून घेण्यावर भर दिला.  राज्यात अस्थिर राजकीय परिस्थिती निर्माण झाल्यावर स्थैर्याचा मुद्दा पुढे करीत भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय पक्षाच्या अनेक नेत्यांना रुचलेला नाही. भाजपबरोबर गेल्यास पक्षाची वाढ खुंटेल आणि जातीयवादाचा शिक्का बसेल, अशी भीती पक्षाच्या नेत्यांना आहे. केवळ स्थैर्यासाठी पाठिंबा दिला, असा दावा केला जात असला तरी त्यातून चुकीचा संदेश जनमानसात गेल्याचे पक्षाचे नेते खासगीत बोलू लागले आहेत. राष्ट्रवादीने भाजपची पाठराखण सुरू ठेवल्यास काही नेते काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचीही चर्चा आहे.
भाजपबरोबर असेच गुफ्तगू सुरू राहिल्यास काँग्रेसचा पर्याय परवडला, अशी बोलकी प्रतिक्रिया पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केली.  भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी घेतल्याने पक्षाच्या अन्य नेत्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे.

पक्षात मोठे फेरबदल
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. राजकारणात यश-अपयश चालतेच, मात्र प्रचंड कामे करूनही अपयश आल्याने वाईट वाटल्याचे सांगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत मोठे फेरबदल होणार असल्याचे संकेत रविवारी िपपरीत बोलताना दिले.पवार म्हणाले,की पक्षविरोधी काम, ऐनवेळी हक्काचे उमेदवार दुसरीकडे जाणे, विरोधकांकडून राष्ट्रवादीची झालेली बदनामी अशा अनेक कारणामुळे राष्ट्रवादीला अपयश आले. या सर्व गोष्टींचा विचार चिंतन शिबिरात होईल. पुढील राजकारणाची भूमिकाही शिबिरात ठरेल.