विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये सुरू असलेल्या ‘महाभरती’वरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी एकाच व्यासपीठावरून एकमेकांना कोपरखळ्या मारल्या.

काँग्रेस नेते आणि माजी संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या ‘विधानगाथा’ पुस्तक प्रकाशन समारंभात ‘महाभरती’च्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि पवारांनी परस्परांना चिमटे काढण्याचीही संधी साधली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीत होणाऱ्या घाऊक पक्षांतरांमुळे कोण कोणत्या पक्षात आहे हेच कळेनासे झाल्याचा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मारला. त्यावर,  छोटी शस्त्रक्रिया होऊनही कार्यक्रमाला आलो, नाहीतर गिरीश महाजन यांच्याबरोबर अमित शहा यांना भेटायला गेलो, असा समज झाला असता, असे पवार म्हणताच सभागृहात निखळ हास्य पसरले.

विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या या प्रकाशनात मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार यांच्यासह सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण हे माजी मुख्यमंत्री, गिरीश महाजन, विनोद तावडे आणि दिवाकर रावते हे मंत्री, बाळासाहेब थोरात आणि जयंत पाटील हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष एकत्र आले होते.

विशेष म्हणजे या पुस्तक प्रकाशन समारंभाचे निमंत्रण देण्याकरिता हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याने पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा आधीच रंगली होती.

‘‘या कार्यक्रमाला उपस्थित राहता येते की नाही याबाबत अनिश्चितता होती. कारण सोमवारी रात्री आपल्यावर छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. कार्यक्रमाला जाऊ नका, असा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. पण उपस्थित राहिलो नसतो तर वेगळी चर्चा झाली असती. अमित शहा यांच्या भेटीला गेलो, असे माध्यमांमधून आले असते,’’ असे शरद पवारांनी सांगताच मुख्यमंत्र्यांसह सारेच हास्यात बुडाले.

‘‘कोण कोणत्या पक्षात आहे हेच कळत नाही. वृत्तपत्रांमध्ये वेगवेगळी नावे येतात. ते वाचून अमुक आपल्या पक्षात येणार आहेत हे कळते,’’ असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडीला मांडी लावून बसलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना चिमटा काढला.

हर्षवर्धन पाटील यांनी संसदीय कार्यमंत्री म्हणून केलेल्या कार्याचा सर्वानीच गौरव केला.

पाटील हे युती आणि आघाडी सरकारमध्ये मंत्री होते. यामुळे दोन्ही पक्षांच्या नेत्यांना ते आपलेसे वाटतात, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगून त्यांच्याबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. गेल्या विधानसभा निवडणुकीत इंदापूर मतदारसंघातून पाटील हे पराभूत झाले होते. पण आगामी निवडणुकीत पाटील हे पुन्हा सभागृहात येतील, असा विश्वास तिन्ही माजी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

अर्थात त्यासाठी राष्ट्रवादीने ही जागा पाटील यांच्यासाठी सोडणे आवश्यक आहे. पण शरद पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या काकांच्या कार्याचा गौरव केला, पाटील यांच्या राजकीय भवितव्याबद्दल काहीही सुतोवाच केले नाही. परिणामी राष्ट्रवादी ही जागा पाटील यांच्यासाठी सोडणार की नाही, याचीच चर्चा पवारांच्या भाषणानंतर सुरू झाली.

पाच वर्षे निवांत मिळाल्याने हे पुस्तक लिहिले, अशी कबुली हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

कार्यक्रमाला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, उभय सभागृहांचे विरोधी पक्षनेते उपस्थित होते.

सारे प्रवासी भाजपचे!

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी उत्सुक असलेल्या कालिदास कोळंबकर, वैभव पिचड, संदीप नाईक आणि शिवेंद्रराजे भोसले या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या चार आमदारांनी मंगळवारी विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा सोपवला.

बुधवारी या नेत्यांना भाजपमध्ये समारंभपूर्वक प्रवेश देण्यात येणार आहे. काँग्रेसचे कालिदास कोळंबकर आणि राष्ट्रवादीचे अकोले येथील आमदार वैभव पिचड, ऐरोलीचे संदीप नाईक, साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले हे तिघे भाजपच्या वाटेवर असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांचा पक्षप्रवेश बुधवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे.

विश्वासू!  पाटील हे सर्व मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातले संसदीय कार्यमंत्री होते, पण आताच्या संसदीय मंत्र्यांबाबत काही माहिती नाही, अशी खोचक टिप्पणी अशोक चव्हाण यांनी विनोद तावडे यांना उद्देशून केली असता, मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात माझे विश्वासू संसदीय कार्यमंत्री, असा तावडे यांचा उल्लेख करून अशोकरावांना प्रत्युत्तर दिले.