टाटा उद्योगसमूहात कुठल्याही पदावर परत येण्यात आपल्याला अजिबात स्वारस्य नाही, असे या समूहाचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांनी रविवारी स्पष्ट केले.

टाटा समूहाच्या अध्यक्षपदी आणि समूहातील कंपन्यांच्या संचालक मंडळावर मिस्त्री यांची पुन्हा नियुक्ती करण्याच्या राष्ट्रीय कंपनी लवादाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्याच्या पाश्र्वभूमीवर मिस्त्री यांनी वरील स्पष्टीकरण दिले. टाटा समूहाचे हित कुणाही व्यक्तीच्या हितापेक्षा अधिक महत्त्वाचे असून; या समूहाच्या भल्यासाठीच आपण हा निर्णय घेतला आहे, असे टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आलेल्या मिस्त्री यांनी रविवारी जाहीर केले. कंपनी लवादाने माझ्या बाजूने निर्णय दिला असला तरी टाटा सन्सचे कार्यकारी अध्यक्षपद किंवा टीसीएस, टाटा टेलिसव्‍‌र्हिसेस, टाटा इंडस्ट्रीज यांच्या संचालकपदासाठी मी इच्छूक नाही. तथापि, संचालक मंडळावरील पद आणि एक छोटा भागधारक म्हणून आमच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी मी सर्व पर्यायांचा अवलंब करीन, असा निर्धार मिस्त्री यांनी व्यक्त केला. चुकीची माहिती पसरवण्याची मोहीम राबवली जात असली, तरी गैरसमज दूर करण्यासाठी मी हे स्पष्टीकरण देत असल्याचे मिस्त्री म्हणाले.