महाड इमारत दुर्घटनेप्रकरणी केवळ गुन्हे दाखल करुन चालणार नाही. तर संबधितांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या घटनेप्रसंगी जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या एनडीआरएफच्या जवानांचे त्यांनी कौतुक केले.

फडणवीस म्हणाले, “सात-आठ वर्षांपूर्वी तयार झालेली इमारत कोसळते आणि १२ जणांचे मृत्यू होतात, हे गंभीर आहे. या इमारतीच्या निर्माण परवानगी प्रक्रियेतील सर्वांची सखोल चौकशी करून त्यांची जबाबदारी निश्चित केली पाहिजे. केवळ गुन्हे दाखल करून चालणार नाही, तर त्यांना कठोर शासन होईल, हे राज्य सरकारने सुनिश्चित करावे”

रायगड जिल्ह्यातील महाड येथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील एनडीआरएफच्या जवानांनी न थकता केलेल्या प्रयत्नांना सलाम. त्यामुळे अनेक प्राण वाचू शकले. या घटनेत जे लोक मृत्यूमुखी पडले, त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आपण सहभागी आहोत. जखमींना लवकर आराम पडो, अशी प्रार्थना करतो, अशा शब्दांत फडणवीस यांनी एनडीआरएफच्या जवानांचे कौतुक केले.