केंद्र सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद केल्याने दहशतवादासाठी होणार पतपुरवठा थांबला आहे. तसेच सुरक्षा दलाच्या जवानांवर होणारी दगडफेक थांबली आहे, असा दावा संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी केला आहे. मुंबईत काल आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. मोदींनी घेतलेल्या या धाडसी निर्णयाचे त्यांनी कौतुकही केले.

भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांच्यातर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर उपस्थित होते. यावेळी त्यांनी नोटबंदीच्या निर्णयावर भाष्य केले. नोटबंदीसारखा धाडसी निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत आहे. या निर्णयाआधी सुरक्षा दलाच्या जवानांवर दगडफेक करण्यासाठी लोकांना पाचशे आणि इतर कामांसाठी हजाराच्या नोटा दिल्या जात होत्या. पण आता नोटाच बंद केल्याने दगडफेक थांबली आहे. तसेच दहशतवादाला पुरवण्यात येणाऱ्या पैशालाही आळा बसला आहे, असे पर्रिकर यांनी सांगितले.

नोटबंदीच्या निर्णयानंतर काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांवर होणारी दगडफेक बंद झाली आहे. दहशतवादाला होणारा वित्तपुरवठाही बंद झाला आहे. याशिवाय अंमली पदार्थांची होणारी तस्करीही काही प्रमाणात कमी झाली आहे, असेही पर्रिकर यांनी सांगितले.