एखाद्या मोठय़ा कारवाईत थेट हॅलिकॉप्टरमधून उतरून किंवा रस्ता मार्गे वाहनाने येऊन एनएसजी कमांडोकडून (नॅशनल सिक्युरिटी गार्ड) कारवाई केली जाते. मात्र मुंबईसारख्या शहरात त्वरित घटनास्थळी पोहोचण्यासाठी लोकल हा उत्तम पर्याय ठरतो. घटनास्थळी रेल्वेमार्गे पोहोचण्याची रंगीत तालीम शुक्रवारी घेण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून एनएसजीच्या १२० जवानांनी शुक्रवारी लोकलने प्रवास केला.
एनएसजी कमांडोसाठी लोकलचे तीन डबे आरक्षित ठेवले होते. कांजुरमार्ग स्थानकातून दुपारी १.१३ वाजता लोकलने प्रवासाला सुरुवात केली व साधारण दोन वाजता सीएसएमटी येथे लोकल पोहोचली. काळ्या कपडय़ातील शस्त्रसज्ज जवान पाहताच प्रवासीही हबकले आणि स्थानकात गोंधळ उडाला.
सीएसएमटीमधून बाहेर पडताच सर्व कमांडो तीन वाहनांमधून निघून गेले. यावेळी त्यांच्या सोबतीला मुंबई पोलीस, वाहतूक पोलीस, रेल्वे सुरक्षा दलाचे जवानही होते. अशाच प्रकारे लवकरच एसएसजीचे जवान अंधेरी ते सीएसएमटी, कुर्ला ते चेंबूर असा प्रवासही करणार आहेत. तर सीएसएमटी परिसरात हॅलिकॉप्टरनेही उतरणे शक्य होते का याचीही चाचपणी करण्यात येणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 29, 2020 12:11 am