सरकारदरबारी अडचणी घेऊन येणाऱ्या एका तरुणाने नैराश्यातून मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेची मंत्रालय प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. गेल्या काही दिवसांत मंत्रालय परिसरात तीन वेळा आत्महत्येचे प्रयत्न झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मंत्रालयाच्या इमारीच्या लॉबीबाहेर नायलॉनच्या जाळ्या बसवण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याचे प्रत्यक्ष काम सोमवारी सुरु करण्यात आले.

गेल्या काही दिवसांपूर्वी ४३ वर्षीय हर्षल रावते या चेंबूरच्या तरुणाने मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरुन उडी घेतली होती, या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्याचबरोबर, अहमदनगरमध्ये राहणाऱ्या २५ वर्षीय अविनाश शेटे या तरुणाने कृषी अधिकारी म्हणून परीक्षा दिली होती. त्यानंतर या परीक्षेबाबत सरकारने काहीच निर्णय घेतला नाही. त्यासाठी अविनाश शेटे वारंवार मंत्रालयाच्या फेऱ्या मारत होता. अखेर वैतागलेल्या अविनाशने मंत्रालयाबाहेर स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता.

तसेच ८० वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांनीही काही दिवासांपूर्वी मंत्रालय परिसरात विष घेऊन आत्महत्या केली होती. आयसीयूत उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी मंत्रालयात वारंवार खेटे घालूनही काम होत नसल्याने धुळे जिल्ह्यातील विखरणच्या धर्मा पाटील यांनी २२ जानेवारी रोजी मंत्रालयात विष प्राशन केले होते.

दरम्यान, विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी या जाळ्या बसवण्याच्या प्रकारावर सडकून टीका केली असून हे मंत्रालय आहे की, सर्कसचा फड? असा सवाल मुख्यंमंत्र्यांना विचारला आहे.