‘लिक्विड बायोप्सी’ या तंत्रज्ञानावर आधारित चाचणीचा पुण्यात शोध; केवळ १५ हजार रुपयांत चाचणी

मुंबई : शरीराला पूर्णपणे विळखा घालण्यापूर्वीच कर्करोगाचे निदान करणारी आणि तो कितपत फोफावला आहे याची माहिती देणारी ‘ऑन्कोडिस्कव्हर’ नावाची चाचणी पुणे स्थित संशोधकांनी तयार केली असून ही केवळ १५ हजार रुपयांमध्ये १ सप्टेंबरपासून उपलब्ध होणार आहे. ‘लिक्विड बायोप्सी’ या तंत्रज्ञानावर आधारित असणारी ही चाचणी सध्या अमेरिकेत उपलब्ध असून केंद्रीय औषध नियंत्रक विभागाने मान्यता दिलेली ही जगातील दुसरी चाचणी आहे.

कर्करोगाची लक्षणे दिसून आल्यानंतर बायोप्सी किंवा अन्य चाचण्यांच्या माध्यमातून निदान केले जाते. परंतु ही लक्षणे दिसून येईपर्यंत अनेकदा हा आजार पसरलेला असतो. यावर मात करण्यासाठी आजाराचे वेळेत निदान करणारी चाचणी पुण्याचे संशोधक डॉ. जयंत खंदारे यांनी विकसित केली आहे. ही चाचणी लिक्विड बायोप्सी या तंत्रज्ञानावर आधारित आहे. यामध्ये रक्ताचे नमुने घेऊन त्यावरून कर्करोगाच्या पेशी शरीरामध्ये निर्माण झाल्या आहेत का, याचे निदान केले जाते. रक्ताच्या माध्यमातून कर्करोगाचे निदान करणारी ही प्रणाली सध्या सेलसर्च या नावाने अमेरिकेत उपलब्ध आहे. परंतु या चाचणीसाठी जवळपास ८४ हजार ते १ लाखापर्यंतच खर्च येतो. भारतासारख्या कर्करोगाचे साम्राज्य पसरलेल्या देशामध्ये मात्र ही चाचणी सध्या उपलब्ध नाही. तेव्हा आपल्या लोकांसाठी ही चाचणी कमीत कमी खर्चात उपलब्ध व्हावी यासाठी गेल्या आठ वर्षांपासून प्रयत्नशील आहोत. सध्या ही चाचणी विकत घेण्यासाठी चार मोठे उद्योजक तयार आहेत. मात्र सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात ही चाचणी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना ती न देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असे डॉ. जयंत खंदारे यांनी सांगितले.

डॉ. खंदारे आणि अरविंदन वासुदेवन यांनी अ‍ॅक्टोरियस इनोव्हेशन अ‍ॅण्ड रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड नावाने स्टार्टअप कंपनी २०१३ मध्ये स्थापित केली. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या जैवतंत्रज्ञान विभागामार्फत जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन साहाय्य परिषदेच्या वतीने संशोधन करण्यासाठी आर्थिक पाठबळ कंपनीला मिळाले. केवळ १ टक्का शाश्वती असूनही या विभागाने विश्वास ठेवून संशोधनासाठी सहकार्य केल्याने हे चाचणी साकारू शकल्याचे डॉ. खंदारे व्यक्त करतात.

ही चाचणी प्रथमच भारतात उपलब्ध होणार आहे. जगभरात या तंत्रज्ञानावर आधारित चाचण्या उपलब्ध असल्या तरी केंद्रीय औषध नियंत्रक विभागाने मान्यता दिलेली अमेरिकेतील पहिली आणि भारतातील दुसरी अशा दोनच चाचण्या सध्या आहेत.

कर्करोगाची बाधा होण्याची संभावना असलेल्या जोखमीच्या गटातील व्यक्तींचे या चाचणीच्या माध्यमातून वेळेत कर्करोगाचे निदान करणे शक्य होईल. तसेच कर्करुग्णांमध्ये पुन्हा कर्करोग पसरण्याची संभाव्यता तपासणे आणि त्यावर देखरेख ठेवणेही या चाचणीने सोईस्कर आहे. बायोप्सीमध्ये शरीराच्या आतील काही भाग

काढून त्यावरून कर्करोगाचे निदान होते. परंतु मेंदूशी निगडित कर्करोगाचे निदान हे बायोप्सीने करणे शक्य नसते. अशा वेळेस कर्करोगाचे निदान आणि त्याचे स्वरूप समजण्यासाठी या चाचणीची नक्कीच मदत होणार असल्याची माहिती डॉ. खंदारे यांनी दिली.

कर्करोगाच्या पेशींचा उगम शोधण्याचे संशोधन

रक्तामध्ये कर्करोगाच्या पेशी आढळून आल्यास त्यांचा उगम शरीराच्या कोणत्या भागात झाला आहे, हे शोधण्याच्या प्रणालीवर सध्या संशोधन सुरू आहे. त्यामुळे लवकरच रक्ताच्या चाचणीमधून शरीराच्या कोणत्या भागात कर्करोगाची बाधा झाली आहे, याचे निदान करणे सोपे जाईल, असे डॉ. खंदारे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.