दहावीच्या विद्यार्थ्यांना करिअरची दिशा निश्चित करता यावी, यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून या वर्षी सुरू करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन कलमापन चाचणीचा अहवाल पूर्ण झाला असून प्रत्येक विद्यार्थ्यांचा कल अहवाल सोमवारी, २५ एप्रिलला राज्य सरकारच्या ‘व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्थे’च्या संकेतस्थळावर ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे.

दहावीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांला शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्राची निवड करण्यासाठी मार्गदर्शन तसेच विद्यार्थी व पालकांना या क्षेत्रांची माहिती देऊन जाणीव जागृती करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांची कलचाचणी घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार या वर्षी ८ ते २५ फेब्रुवारीदरम्यान विद्यार्थ्यांची ऑनलाइन कलचाचणी घेतली गेली. यात राज्यभरातील १५ लाख ४७ हजार २५३ विद्यार्थ्यांनी कलचाचणी दिली. या कलचाचणीचा निकाल सोमवारी दुपारी एक वाजल्यापासून ६६६.्र५ॠ२.ूं.्रल्ल या संकेतस्थळावर ऑनलाइन स्वरूपात विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. या निकालची छापील प्रत मात्र दहावीच्या गुणपत्रिकेबरोबरच विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.

या कल अहवालात विद्यार्थ्यांचा एखाद्या क्षेत्राकडे असणारा कल तसेच विशिष्ट अभ्यासक्रम किंवा शाखा निवडण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अहवालात असणाऱ्या माहितीवरून विद्यार्थ्यांना दहावीनंतरच्या शिक्षणाबाबत स्वत:साठी अनुरूप निर्णय घेता येईल. विद्यार्थी व पालकांसाठी विविध शैक्षणिक संस्था, अभ्यासक्रम, प्रवेशप्रक्रिया, शिष्यवृत्ती आदी विषयीची उपयुक्त माहितीही उपलब्ध करून देण्यात आली असून www.mahacareermitra.in या वेबपोर्टलवर ती पाहता येईल. तसेच ३ मेपासून ८२७५१००००१ हा हेल्पलाइन क्रमांक  सुरू करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना त्यावर आपल्या शंका विचारता येतील, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.