‘प्रजा फाउंडेशन’चे वार्षिक प्रगतिपुस्तक जाहीर

मुंबई : ‘प्रजा फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेच्या वार्षिक प्रगतिपुस्तकात यंदा शिवसेनेचा क्रमांक घसरला आहे. पहिल्या दहा नगरसेवकांमध्ये शिवसेनेचे केवळ दोन नगरसेवक आहेत, तर पक्षीय कामगारीतही काँग्रेसने पहिला क्रमांक पटकावला असून दुसरा क्रमांक भाजपला देण्यात आला आहे. शिवसेना मात्र तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

मुंबई महानगरपालिकेतील विविध पक्षांच्या नगरसेवकांच्या कामगिरीचे २०२० या वर्षांचे प्रगतिपुस्तक प्रजा फाउंडेशन या संस्थेने जाहीर केले आहे. पालिकेत गेल्या २० वर्षांहून अधिक काळ सत्तेत असलेल्या शिवसेनेचा या प्रगतिपुस्तकावर नेहमीच वरचष्मा असतो. यंदा मात्र शिवसेनेच्या नगरसेवकांची कामगिरी घसरली असल्याचे या अहवालात जाणवत आहे. हे प्रगतिपुस्तक मांडताना नगरसेवकांचे शिक्षण, गुन्हेगारी पार्श्वभूमी, त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तक्रारी, न्यायालयातील याचिका, सभागृहातील हजेरी, सभेमध्ये उपस्थित केलेले प्रश्न, नगरसेवक निधीचा केलेला वापर या सगळ्या गोष्टींचा विचार करून हे प्रगतिपुस्तक तयार केले जात असल्याचे संस्थेचे म्हणणे आहे.

प्रश्नांच्या दर्जाचाही आढावा

नगरसेवक किती प्रश्न विचारतात त्याचबरोबर कोणत्या दर्जाचे प्रश्न विचारतात याचाही या वेळच्या अहवालात आढावा घेण्यात आला आहे. एकूणच सभागृहात प्रश्न विचारण्याचे प्रमाण कमी झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. तसेच जनतेशी संबंधित प्रश्न विचारण्याचे प्रमाणही घटले असल्याचे म्हटले आहे. मलनि:सारण, कचरा, पाणी, रस्ते, पावसाचे पाणी तुंबणे अशा विषयांवरच्या जितक्या तक्रारी असतात त्या तुलनेत विचारलेल्या प्रश्नांचे प्रमाण दहा टक्क्यांच्या आत असल्याचेही आढळून आले आहे.

पहिल्या दहामध्ये शिवसेनेचे दोनच नगरसेवक

पालिकेत सध्या विरोधी पक्षाच्या भूमिकेत असलेल्या भाजपने यंदा पहिल्या दहा क्रमांकामध्ये बाजी मारली आहे. पहिल्या दहामध्ये भाजपचे पाच, काँग्रेसचे तीन, तर शिवेसनेचे केवळ दोन नगरसेवक आहेत. भाजपचे हरीश छेडा, नेहल शहा यांनी पहिले दोन क्रमांक पटकावले असून शिवसेनेचे अनंत नर आणि समाधान सरवणकर यांनी तिसरा व चौथा क्रमांक पटकावला आहे. अन्य नगरसेवकांमध्ये भाजपचे स्वप्ना म्हात्रे, आशा मराठे, प्रभाकर शिंदे, तर काँग्रेसचे रवी राजा, वीरेंद्र चौधरी, कमरजहाँ सिद्दीकी यांचा समावेश आहे.

१३ नगरसेवकांकडून एकही प्रश्न नाही

पालिकेच्या २२७ पैकी १३ नगरसेवकांनी या वर्षी सभागृहात एकही प्रश्न उपस्थित केलेला नाही. त्यात एमआयएमच्या दोन्ही नगरसेवकांचा समावेश आहे. काँग्रेसच्या निकिता निकम, सुप्रिया मोरे, विन्नी डिसुझा तर राष्ट्रवादीच्या मनीषा रहाटे, अखिल भारतीय सेनेच्य गीता गवळी, माजी महापौर शिवसेनेचे नगरसेवक मिलिंद वैद्य, संगीता सुतार, स्नेहल मोरे, मरियम्मल थेवर, ऊर्मिला पांचाळ, भाजपचे शिवकुमार झा, रंजना पाटील यांचाही त्यात समावेश आहे. त्यापैकी काँग्रेसच्या सुप्रिया मोरे, एमआयएमच्या गुलनाझ कुरेशी आणि राष्ट्रवादीच्या मनीषा रहाटे यांनी २०१७ पासून एकही प्रश्न उपस्थित केलेला नाही.