News Flash

रेल्वेतील गर्दी नियंत्रणाचा फज्जा

सर्वसामांन्य नागरिकांना मर्यादित वेळेत लोकल प्रवासास परवानगी देण्यात आल्यानंतर उपनगरीय रेल्वे स्थानकांमध्ये मोठय़ा प्रमाणावर गर्दी होऊ लागली असून स्थानकांमध्ये गर्दी नियंत्रणाला हरताळ फासला जात आहे.

स्थानक परिसरात फेरीवाल्यांचा वावर वाढला असून प्रवाशांमध्ये लहान मुलांची संख्या वाढताना दिसत आहे.

पश्चिम, मध्य रेल्वेवर मेट्रोप्रमाणे फ्लॅप गेट बसवण्याचा प्रकल्प बारगळला

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : सर्वसामांन्य नागरिकांना मर्यादित वेळेत लोकल प्रवासास परवानगी देण्यात आल्यानंतर उपनगरीय रेल्वे स्थानकांमध्ये मोठय़ा प्रमाणावर गर्दी होऊ लागली असून स्थानकांमध्ये गर्दी नियंत्रणाला हरताळ फासला जात आहे. इतकेच नव्हे तर स्थानक परिसरात फेरीवाल्यांचा वावर वाढला असून प्रवाशांमध्ये लहान मुलांची संख्या वाढताना दिसत आहे. त्याचबरोबर तिकीट खिडक्यांसमोर उसळणारी गर्दी, शारीरिक अंतर नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे, तर मेट्रो स्थानकाप्रमाणेच पश्चिम व मध्य रेल्वेकडून उपनगरीय स्थानकात राबविण्यात येणारा फ्लॅप गेट (स्वयंचलित दरवाजे) प्रकल्पही बारगळला आहे. सीएसएमटी स्थानकातील प्रयोगानंतर मात्र दोन्ही रेल्वे प्रशासनाकडून अद्यापही अंतिम निर्णयही घेण्यात आलेला नाही. प्रकल्प अद्याप पुढे सरकला नसल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली.

जून २०२० पासून अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरू झाली. त्यानंतर फे ब्रुवारी २०२१ मध्ये ठरावीक वेळेत सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची मुभा दिली. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील प्रवासी संख्या १७ लाखांपर्यंत, तर मध्य रेल्वेवरील प्रवासी संख्या २२ लाखांपर्यंत पोहोचली आहे. जून महिन्यापासून प्रवाशांचा काहीसा ओघ वाढतच गेला आणि स्थानकात गर्दीही वाढू लागली. गेल्या वर्षी साधारण सप्टेंबर महिन्यात गर्दी नियंत्रण व प्रवाशांना शिस्त लागावी यासाठी मेट्रो स्थानकाप्रमाणेच फ्लॅप गेट (स्वयंचलित दरवाजे) बसवण्याचा निर्णय घेतला. मध्य रेल्वेने प्रथम सीएसएमटी टर्मिनसवर गेट बसवले. यानंतर चर्चगेट स्थानकात, तर मध्य रेल्वेकडून उपनगरीय स्थानकात हे गेट बसवण्याचा विचार पुढे आला. मात्र अद्यापही त्याची पूर्तता झालेली नाही. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी प्रकल्पाबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे सांगितले. मध्य रेल्वेचे मुख्य जंनसपर्क अधिकारी यांनीही सीएसएमटी टर्मिनसनंतर फ्लॅप गेट अन्य ठिकाणी बसवण्याबाबत काहीही विचार नसल्याचे स्पष्ट केले.

तिकीट खिडक्यांसमोर गर्दी, लहानग्यांचाही प्रवास

तिकीट खिडक्यांसमोर रांगा लावताना प्रवाशांमध्ये शारीरिक अंतराच्या नियमाचे पालन होत नाही. अशीच स्थिती स्थानकातील एटीव्हीएमसमोरही असते. लोकल पकडण्यासाठी फलाटावर अंतर ठेवून उभे राहण्यासाठी चिन्हे दर्शविण्यात आल्यानंतरही प्रवाशांकडून शिस्त पाळली जात नाहीत. या गर्दीवर नियंत्रणासाठी रेल्वे पोलीस तैनात असतानाही त्याकडे दुर्लक्षच होते.

महिलांना २१ ऑक्टोबर २०२० पासून ठरावीक वेळेत लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली. त्यामुळे नोकरी-व्यवसायानिमित्त घराबाहेर पडणे आवश्यक असलेल्या महिलांची सोय झाली. या महिलांसाठी ठरावीक वेळ दिल्यानंतरही काही महिला खरेदीच्या किंवा नातेवाईकांना भेटण्याच्या निमित्ताने सर्रास लहान मुलांना घेऊन प्रवास करताना आढळून येत आहे. गरज असेल तर प्रवास करण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. करोनाकाळात लहान मुलांना सोबत घेऊन प्रवास करणाऱ्या महिलांमुळे धोका वाढू शकतो, असे रेल्वे प्रशासनाने काढलेल्या पत्रात नमूद के ले होते. रेल्वे बोर्डाने फक्त महिलांना लोकल प्रवासाची परवानगी दिली आहे. तरीही महिला लहान मुलांना सोबत घेऊन प्रवास करताना दिसतात.

फेरीवाल्यांचा वावर वाढला

मध्य आणि पश्चिम रेल्वे उपनगरीय स्थानक हद्दीत व लोकल प्रवासात फे रीवाल्यांचा वावरही वाढला आहे. महिलांच्या डब्यात त्याचे प्रमाण अधिक असून प्रवास करताना मनस्ताप होत असल्याचे उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या सरचिटणीस लता अरगडे यांनी सांगितले. सीएसएमटी, दादर, कुर्ला, दिवा, ठाणे स्थानकातून बिनदिक्कतपणे फेरीवाले सामानासह प्रवेश करतात. आधीच गर्दी, त्यात या फेरीवाल्यांमुळे डब्यात वावरताना अडचण होत असल्याचे त्या म्हणाल्या. १ जून २०२० ते २८ फे ब्रुवारी २०२१ पर्यंत १ हजार ८११ फेरीवाल्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून आतापर्यंत १७ लाख २४ हजार ८०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. फे ब्रुवारी २०२१ मध्ये ५९१ फे रीवाल्यांना पकडण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त जितेन्द्र श्रीवास्तव यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2021 1:07 am

Web Title: railway crowd control dd 70
Next Stories
1 खासगी रुग्णालयांमध्येही नोंदणीची सुविधा
2 ठक्कर्स कॅटर्सच्या उपाहारगृहाला टाळे
3 आता घातक कचऱ्यावरही प्रक्रिया
Just Now!
X