अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र, मध्य भारतातील कमी न झालेले आद्र्रतेचे प्रमाण अशा हवामानातील बदलांमुळे ३१ ऑक्टोबपर्यंत मुंबई, पालघर आणि रायगड जिल्ह्य़ासह राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या मतदानाबरोबरच दिवाळीवरही पावसाचे सावट आहे.

पावसाच्या दीर्घकालीन पूर्वानुमानानुसार २४ ऑक्टोबपर्यंत उत्तर आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र, संपूर्ण किनारपट्टीवर काही ठिकाणी मुसळधार (६५ ते ११५ मिमी) पावसाची, तर २५ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबरदरम्यान मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.

गेल्या दोन दिवसांत राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस कोसळला. मराठवाडय़ातील कायम सरासरीपेक्षा कमी असणाऱ्या परभणी, बीड, जालना या ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. शनिवारी रात्री परभणीत सर्वाधिक म्हणजेच ९६.१ मिमी पावसाची नोंद झाली. रविवारी संध्याकाळी साडेपाचपर्यंत रत्नागिरी, अलिबाग, चिखलठाणा, सांगली, महाबळेश्वर, नाशिक, पुणे आणि मुंबई अशा अनेक ठिकाणी तुरळक पाऊस झाला. बारामती येथे रविवारी दिवसभरातील सर्वाधिक म्हणजेच ७३.६ मिमी पाऊस पडला. कोल्हापुरात गडगडाटासह २३ मिमी पावसाची नोंद झाली. पावसामुळे अनेक जिल्ह्य़ांमधील तापमानात घट झाली असून सर्वत्र पारा ३० अंशाखाली आला आहे.

पाऊस कशामुळे? : नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या आगमनाआधी आणि परतीनंतरच्या काळात अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होते. काही वेळा या क्षेत्राची तीव्रता वाढल्यास त्याचे रूपांतर चक्रीवादळात होते. ऑक्टोबरमध्ये अशा प्रकारे कमी दाबाचे क्षेत्र आणि चक्रीवादळाच्या नोंदी यापूर्वीही झाल्या आहेत. यावर्षी नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास विलंबाने (१६ ऑक्टोबर) संपला आणि त्याच दिवशी ईशान्य मोसमी वाऱ्यांचे आगमन तमिळनाडूमध्ये झाले. शक्यतो या दोन मोसमी वाऱ्यांमध्ये अंतर असते. त्या काळात हवेतील आद्र्रतेचे प्रमाण कमी होते. मात्र यावर्षी हवामानात असा बदल होण्याची संधीच मिळाली नाही. परिणामी या काळात तापमानात वाढ झाल्यास पावसाची शक्यता असते. सध्या महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात या कारणामुळे पाऊस पडत असल्याचे हवामान विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. तर राज्याच्या किनारपट्टीवरील पाऊस हा कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पडत आहे.

आज, उद्या सरींची शक्यता

दोन दिवस (२१ आणि २२ ऑक्टोबर) मुंबई, पालघर आणि रायगड जिल्ह्य़ात गडगडाटासह पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद आणि विदर्भातील काही  जिल्ह्य़ात जोरदार वाऱ्यासह, विजा चमकून गडगडाटासह वादळी पाऊस पडू शकतो.