मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

राज्य सरकारने अनेक पायाभूत सुविधांच्या विकासाची कामे हाती घेतली असून या सर्व विकासकामांना गती देण्यासाठी अतिरिक्त साधनसंपत्तीची उभारणी करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यासाठी राज्य सरकारच्या सिडको, म्हाडासारख्या आर्थिकदृष्टय़ा सक्षम अशा विविध प्राधिकरण, महामंडळांनी राज्य सरकारने काढलेल्या रोख्यांमध्ये निधी गुंतवावा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

राज्याच्या विकास कामांसाठी अतिरिक्त साधनसंपत्ती उभारणीबाबत सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. बैठकीस वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव सुमित मलिक, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दिनेशकुमार जैन, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांच्यासह संबंधित विभाग, महामंडळे, मंडळे आणि प्राधिकरणे यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्य सरकारने नुकतेच १२५० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस काढले होते. या शिवाय राज्य सरकार वेळोवेळी रोखे काढत असते. त्यात सरकारी विभागांचा अतिरिक्त पैसा गुंतवला गेल्यास मोठा निधी मिळू शकतो.

सिडको, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण, म्हाडा, महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ, बांधकाम कल्याण कामगार मंडळ, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यासह इतर मंडळे, महामंडळे आणि प्राधिकरणाकडील अतिरिक्त निधी राज्य शासनाच्या कर्जरोख्यात गुंतवल्यास राज्य सरकार, महामंडळे आणि मंडळे या दोघांनाही फायदा आहे. या निधीवर महामंडळे, मंडळे आणि प्राधिकरणाचाच अधिकार राहील, त्यांना हवा त्या वेळी त्यांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही मुख्यमंत्री या वेळी म्हणाले.