किती वेळा उमेदवारी द्यायची, नेत्यांचाच सवाल

विधान परिषदेच्या मुंबई स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे नवी दिल्लीत जोरदार प्रयत्न सुरू आहेत. कुडाळ आणि वांद्रे पूर्व या दोन मतदारसंघांमध्ये लागोपाठ पराभव झाल्याने राणे यांना किती वेळा संधी द्यायची, असा सवाल पक्षात व्यक्त केला जात आहे.
मुंबईतील दुसऱ्या जागेसाठी काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरस आहे. काँग्रेसमध्ये विद्यमान आमदार भाई जगताप यांनी उमेदवारीकरिता दावा केला असतानाच माजी मुख्यमंत्री राणे यांनीही जोर लावला आहे. काँग्रेसकडे पुरेशी मते नसल्याने तगडा उमेदवार उभा करण्याशिवाय पर्याय नाही. या दृष्टीने राणे यांनी जोर लावला आहे. राणे यांच्याबाबत पक्षाच्या केंद्रीय नेत्यांच्या मनात असलेली अढी अद्यापही दूर झालेली नाही. विशेषत: मुख्यमंत्रिपद नाकारल्यानंतर राणे यांनी थेट राहुल गांधी आणि अहमद पटेल यांनाच लक्ष्य केले होते. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबद्दल शंका घेणारे पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदसिंग यांची गेल्याच आठवडय़ात प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याने राणे यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. गेल्याच आठवडय़ात राणे यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती.
राज्यातील विधान परिषदेच्या उमेदवारांची नावे पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या संमतीने निश्चित होणार आहेत. राणे यांच्याबद्दलचे मळभ अद्यापही नेतृत्वाच्या मनातून दूर झालेले नाही.
राणे यांच्या उमेदवारीला मुंबई काँग्रेसमध्ये वर्चस्व असलेल्या गुरुदास कामत यांच्या गटाचा विरोध आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम हेसुद्धा राणे यांच्या उमेदवारीकरिता फारसे अनुकूल नाहीत. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी राणे यांनाच कशाला उमेदवारी द्यायची, असा सवाल काही नेत्यांनी दिल्लीत केल्याचे समजते.

भाजपमध्ये स्पर्धा
भाजपमध्ये नगरसेवक मनोज कोटक हे इच्छुक आहेत. पण मनसेच्या पाठिंब्याकरिता मराठी उमदेवार द्यावा लागल्यास मधू चव्हाण, माधव भंडारी, केशव उपाध्ये आदी नेत्यांचे प्रयत्न सुरू असल्याचे समजते.