एन ९५ मास्क आणि हजमत सूट (पीपीई) यांच्या विक्री, वितरण आणि दरांवरही राज्य सरकारने शनिवारपासून निर्बंध लागू केले आहेत. त्यांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिसूचनेत स्पष्ट के ले आहे.

करोना विषाणू फैलावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात एन ९५, पीपीईची आवश्यकता आरोग्य कर्मचाऱ्यांना मोठय़ा प्रमाणात आहे. सध्या राज्यात अनेक विक्रेत्यांकडून या वैयक्तिक सुरक्षा साधनांची विक्री होत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही साधने गुणवत्तापूर्ण नसल्यास आरोग्य कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग होण्याचा धोका उद्भवू शकतो. या दृष्टीने उत्पादक, वितरक, दलाल यांनी या वस्तूंची राज्यात विक्री करण्यापूर्वी संबंधित उत्पादन हाफकिन बायोफार्मासिटय़ुकलकडून प्रमाणित करून घ्यावे लागेल. त्याशिवाय याची विक्री केल्यास साथरोग नियंत्रण कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली जाईल, असे आरोग्य विभागाने अधिसूचनेद्वारे जाहीर केले आहे.

अनावश्यक साठेबाजीला लगाम घालण्यासाठी एन ९५ मास्क आणि पीपीई यांची विक्री व वितरण फक्त राज्य शासनाने ठरवून दिलेल्या दराने करावे. हे विक्री किंवा वितरण केवळ राज्य शासनास किंवा राज्य शासनाने खरेदी करण्याची परनवागी दिलेल्या संस्थेमध्येच करता येईल, असेही या अधिसूचनेत नमूद केले आहे.

संपर्कासाठी..

काही अडचणी असल्यास पुढील संस्थांशी संपर्क साधण्याचे आरोग्य विभागाने कळवले आहे.

* व्यवस्थापकीय संचालक, हाफकिन बायोफार्मासिटय़ुकल लिमिटेड – ०२२ २४१५०६२८

*  सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग – ०२२ २२६२२१७९

* प्रधान सचिव, आरोग्य विभाग – ०२२ २२६१७३८८