माटुंगा येथील लोकार्पण करण्यात येत असलेल्या उद्यानाच्या सुशोभीकरणाच्या श्रेयावरून रविवारी सायंकाळी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये जुंपली. शिवसैनिकांनी घोषणाबाजी करीत आक्षेप घेणाऱ्या काँग्रेस नगरसेविकेची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी करीत शिवसैनिकांना शांत केले आणि वादावर पडदा पडला.
माटुंगा येथील सुशोभीकरण केलेल्या ‘फाइव्ह गार्डन’च्या लोकार्पणाचा सोहळा रविवारी आयोजित करण्यात आला होता. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या उद्यानाचे लोकार्पण करण्यात येणार होते.  एखादा प्रकल्प साकारण्यासाठी जो नगरसेवक सातत्याने पाठपुरावा करतो, त्याच्याच हस्ते त्याचे उद्घाटन व्हायला हवे, असा टोला हाणत व्यासपीठावर उपस्थित काँग्रेस नगरसेविका नयना सेठ यांनी आपण या उद्यानाचा कायापालट व्हावा यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगताच उपस्थित शिवसैनिक भडकले. काँग्रेसच्या विरोधात घोषणाबाजी करीत शिवसैनिक व्यासपीठाच्या जवळ येऊ लागले. प्रसंगावधानता राखून काँग्रेस कार्यकर्त्यांनी नयना सेठ यांना शांत केले आणि त्या व्यासपीठावर आसनस्थ झाल्या. त्यानंतर सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव यांनी आक्रमक पवित्रा घेत नयना सेठ यांच्यावर टीकास्त्र सोडले. मात्र उद्धव ठाकरे यांनी प्रसंगावधानता राखून ध्वनिक्षेपकाचा ताबा घेतला.
नयना सेठ यांच्याबद्दल आदर असल्यामुळेच त्यांना व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आले. जो काम करतो, त्याचे श्रेय त्याला द्यायलाच हवे. या उद्यानामुळे लहान मुलांना आनंद मिळणार आहे. त्याचे मला समाधान आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार असताना आम्ही अनेक कामांची मुहूर्तमेढ रोवली. पण त्या कामांचे उद्घाटन काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारच्या काळात झाली. असे होतच असते.