काँग्रेस, समाजवादीची शिवसेनेला साथ

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबई महापालिकेतील प्रभाग समित्यांच्या सत्तेपासून भाजपला दूर ठेवण्याचा विडा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पार्टीने उचलला असून बुधवारी झालेल्या ए, बी, ई प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या चार, समाजवादी पार्टीच्या एका नगरसेवकाने शिवसेनेच्या पारडय़ात मते टाकली आणि शिवसेनेचे रमाकांत रहाटे आठ मते मिळवून विजयी झाले. मागील निवडणुकीत या प्रभाग समितीत भाजपचा विजय झाला होता.

जी-दक्षिण, जी-उत्तर, सी, डी, ए, बी आणि ई या सहा प्रभाग समिती अध्यक्षपदाची निवडणूक बुधवारी पार  पडली. ए, बी आणि ई प्रभाग समितीमध्ये शिवसेनेचे तीन, भाजपचे चार, काँग्रेसचे चार आणि समाजवादी पार्टीचा एक नगरसेवक असे संख्याबळ आहे. यंदा भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पार्टीने बांधला आहे. त्यामुळे प्रभाग समित्यांमध्ये परिस्थितीनुसार शिवसेनेला मतदान करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला. त्यानुसार ए, बी, ई प्रभाग समितीमध्ये काँग्रेस, समाजवादीच्या नगरसेवकांनी शिवसेनेचे उमेदवार रमाकांत रहाटे यांच्या पारडय़ात मते टाकली. शिवसेनेची तीन, काँग्रेसची चार आणि समाजवादी पार्टीचे एक अशी आठ मते मिळवून रमाकांत रहाटे विजयी झाले, तर भाजपचे मकरंद नार्वेकर यांना तीन मते मिळाली.

जी-दक्षिण, जी-उत्तर प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात केवळ शिवसेनेने अनुक्रमे दत्ता नरवणकर आणि जगदीश मुक्कुनी थैवलपिल यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे त्यांना विजयी घोषित करण्यात आले.

कोण विजयी?

* सी आणि डी प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने मीनल पटेल यांना उमेदवारी दिली होती. या प्रभागातही केवळ एकच उमेदवारी अर्ज सादर झाला होता. त्यामुळे मीनल पटेल यांना विजयी घोषित करण्यात आले.

* एच-पूर्व आणि एच-पश्चिम प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या प्रज्ञा भूतकर आणि भाजपच्या हेतल गाला आमनेसामने होत्या. या निवडणुकीत प्रज्ञा भूतकर आठ मते मिळवून विजयी झाल्या. तर हेतल गाला यांना चार मते मिळाली.

* एफ-दक्षिण आणि एफ-उत्तर प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे रामदास कांबळे १० मते मिळवून विजयी झाले, तर भाजपच्या नेहल शाह यांना तीन मते मिळाली.