विभागीय मंडळातील ओळखीने मुंब्रा येथील शाळेची परीक्षा केंद्र म्हणून निवड

मुंबई : दहावीच्या प्रश्नपत्रिका फोडण्यासाठी मुख्य आरोपी आणि अंबरनाथमधील ब्रिलियन्ट क्लासचा शिक्षक फिरोज खान याने वर्षभरापासून टप्प्याटप्प्याने तयारी सुरू केली होती. मुंब्रा येथील किड्स पॅराडाईज शाळेत शिक्षण म्हणून नोकरी आणि या शाळेला विभागीय मंडळामार्फत परीक्षा केंद्राची परवानगी मिळवून देणे हे पेपरफुटीच्या तयारीचा भाग होता, अशी माहिती अंबोली पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासातून पुढे येत आहे. फिरोज आणि विभागीय मंडळातील अधिकारीवर्गातील ओळख आणि संभाव्य आर्थिक व्यवहार हेही तपासाचे विषय असल्याचे पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले.

फिरोजला २०१३मध्ये प्रश्नपत्रिका फोडल्याबद्दल अटक झाली होती. याशिवाय लहान मुलावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हाही त्याच्याविरोधात दाखल आहे. अशा गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या फिरोजला यंदाच्या दहावीच्या प्रश्नपत्रिका फोडण्यासाठी परीक्षा केंद्र असलेली शाळा हवी होती. साधारण दहा महिन्यांपूर्वी तो मुंब्रा येथील किड्स पॅराडाईज शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाला. तत्पूर्वी वाशी येथील विभागीय मंडळाच्या कार्यालयातील ओळखीमुळे शाळेच्या मुख्याध्यापिकेला फिरोजने प्रभावित केले.  फिरोजने आपली ओळख वापरून मंडळाकडून किड्स पॅराडाईज शाळेत परीक्षा केंद्रासाठीची परवानगी मिळवली.  त्याच्या या ओळखीमुळेच मुख्याध्यापिकेने फिरोजला परीक्षा केंद्रावरील चीफ कंडक्टर नेमले. त्याचाच फायदा घेत सकाळी विभागीय कार्यालयातून प्रश्नपत्रिकांचा गठ्ठा शाळेत आल्यावर माध्यमांनुसार वेगळ्या करण्याच्या प्रक्रियेत फिरोजने मोबाइलद्वारे त्यांची छायाचित्रे काढली आणि आपल्या सहकाऱ्यांना धाडली.