विद्युत कंत्राटदाराचे कामाचे बिल मंजूर करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या राज्य परिवहन मंडळाच्या कार्यकारी अभियंता, उप अभियंता आणि त्यांच्या साथीदारास अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत विरोधी पथकाने कुर्ला बस डेपो येथील अधिकारी निवासस्थानात कारवाई करत आधी या अभियंत्यांच्या साथीदाराला अटक केली. त्याच्या चौकशीतून कार्यकारी अभियंता व उपअभियंता यांची नावे समोर आल्यावर त्यांनाही अटक करण्यात आली. वसई बस आगारात विद्युतीकरणाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने ऑक्टोबर महिन्यात केलेल्या कामाचे ५ लाख २१ हजार ४९७ रुपयांचे बिल सादर केले. हे बिल मंजूर करण्यासाठी एसटीचे कार्यकारी अभियंता (विद्युत) नागेंद्र देवके यांनी उपअभियंता प्रकाश पडलवार यांच्यामार्फत पाच टक्के रकमेची मागणी कंत्राटदाराकडे केली होती.