रोज म.रे. त्याला कोण रडे ही म्हण मध्य रेल्वेच्या बाबतीत शब्दशः खरी ठरते आहे. काही वेळापूर्वीच दादर स्टेशनच्या जलद मार्गावर तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे अनेक लोकल गाड्या रखडल्या आहेत. बिघाड होऊन अर्धा तास झाला तरीही दुरुस्तीचं काम पूर्ण झालेलं नाही. दिवसभरातला हा तिसरा प्रकार आहे. काही जलद लोकल धीम्या मार्गावरुन वळवण्यात आल्या आहेत. त्यामुळे धीम्या मार्गावरचे लोकलचे वेळापत्रकही कोलमडले आहे. कल्याणच्या दिशेने जाणारी म्हणजेच डाऊन जलद मार्गावरची लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाला आहे असेही समजते आहे.

आज सकाळी तीन बिघाड ठाणे स्टेशनजवळ झाले होते. त्यामुळे दिवसभर मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले होते. सगळ्या लोकल 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत होत्या. आता अर्ध्या तासापूर्वी पुन्हा एकदा दादर स्टेशनजवळ तांत्रिक बिघाड झाला आहे. हा बिघाड अद्याप दुरुस्त झालेला नाही. त्यामुळे घर गाठणाऱ्या मुंबईकरांना हाल सहन करावे लागत आहेत.

पावसाळ्यात दोन  ते तीनवेळा मध्य रेल्वे 10 तासांपेक्षा जास्त काळ बंद होती. गेल्याच आठवड्यात लोकल सेवा बंद पडण्याचा अनुभव मुंबईकरांनी घेतला. आता पावसाचं प्रमाण कमी झालं आहे तरीही मध्य रेल्वे मार्गावरच्या लोकल वाहतुकीची रखडपट्टी सुरुच आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून सातत्याने ट्रेन लेट होत आहेत. ज्यामुळे घरापासून मुंबईत कामावर येणाऱ्या मुंबईकरांना आणि घरी परतणाऱ्या मुंबईकरांना त्रास सहन करावा लागतो आहे. मात्र मध्य रेल्वे प्रशासनाला मुंबईकरांची चिंता नाही असंच म्हणावं लागेल इतके हे तांत्रिक बिघाड दिवसागणिक होताना दिसत आहेत.