पाण्याबरोबरच राज्यात वीज टंचाईचेही संकट
राज्यातील दुष्काळाची परिस्थिती १९७२च्या दुष्काळापेक्षा गंभीर आहे. अशा वेळी दुष्काळग्रस्तांच्या डोळ्यातील आसवे पुसण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी तळागाळात जाऊन सरकार करीत असलेल्या उपायांची माहिती द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी केले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकारी मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना दुष्काळाच्या मुद्दय़ावर अधिक सतर्क केले.
 याप्रसंगी राज्याचे पक्षाचे प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम हे उपस्थित होते. सध्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. पाणी आणायचे कोठून हा मोठा प्रश्न आहे. दुष्काळग्रस्तांच्या मदतीकरिता सरकार विविध उपाय योजत आहे. लोकांना जास्तीत जास्त मदत मिळाली पाहिजे, असा सरकारचा प्रयत्न असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पाण्याचे संकट असतानाच नैसर्गिक वायूअभावी दाभोळ वीज प्रकल्प बंद पडला. जायकवाडीत पाणीच नसल्याने परळीच्या वीजनिर्मिती प्रकल्पाचे भवितव्य अधांतरी आहे. पाण्याबरोबरच वीज टंचाईचे संकट राज्यावर असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सूचित केले.
 राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी राहुल गांधी यांचे गुणगान गायिले.