दुसऱ्या मात्रेसाठी तीन महिन्यांची प्रतीक्षा; लसीकरणासाठी थांबल्यास शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची चिंता

इंद्रायणी नार्वेकर

मुंबई : परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबईसह विविध महापालिकांनी विशेष लसीकरण मोहीम राबवण्यास सुरुवात केली असली तरी या विद्यार्थ्यांपुढील अडचणी संपण्याची चिन्हे नाहीत. या विद्यार्थ्यांना कोव्हिशिल्ड लस देण्यात येत असल्याने पहिली मात्रा घेतल्यानंतर त्यांना दुसऱ्या मात्रेसाठी ८४ दिवस अर्थात जवळपास तीन महिने वाट पाहावी लागणार आहे. इतके दिवस प्रतीक्षा करायची म्हटल्यास, परदेशातील शिक्षणसंधी हुकण्याची चिंता आहे. तर लसीकरणाशिवाय परदेशात जाण्यात अडथळे निर्माण होणार आहेत.

लशींच्या अपुऱ्या साठय़ामुळे १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण मोहीम थांबवण्यात आली आहे. मात्र, परदेशात शिक्षणासाठी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना नियमानुसार लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीही ते आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार या महापालिकांनी या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम सुरू केली आहे. त्याला मोठा प्रतिसाद मिळत असून दररोज शेकडो विद्यार्थी लसीकरण केंद्रांच्या रांगेत उभे राहात आहेत.

पालिकांच्या मोहिमेमुळे या विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचा प्रश्न सुटला असला तरी, कोव्हिशिल्ड लशीच्या दोन मात्रांतील कालावधीमुळे नवा पेच निर्माण झाला आहे. कल्याणमध्ये राहणारी रिया ‘युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास’मध्ये ‘माहिती तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन’ या विषयातील उच्च शिक्षणासाठी जाणार आहे. तिचे शैक्षणिक वर्ष २३ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. तिने मंगळवारी लस घेतली असून आताच्या नियमानुसार तिला दुसरा डोस २५ ऑगस्टनंतर घेता येणार आहे. त्यामुळे काय करावे असा प्रश्न तिला पडला आहे.

मुंबईत तीन के ंद्रांवर जमलेल्या विद्यार्थ्यांपैकी अनेकांना या अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. लशीची एक मात्रा घेतली आणि दुसरी मात्रा न घेताच परदेशात गेलो आणि प्रवेश नाही मिळाला तर अशी चिंता काहींना सतावत होती. तर दोन्ही मात्रा परदेशात जाऊन घ्याव्या का, असाही प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना पडला आहे. ८४ दिवसांचा कालावधी कमी होईल का असा प्रश्न अनेक विद्यार्थी लसीकरण के ंद्रावरील कर्मचाऱ्यांना विचारत होते. मात्र कर्मचाऱ्यांनाही याबाबत पुरेशी माहिती नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर होत नव्हता. एक मात्रा इथे घेतली आणि दुसऱ्या लशीची दुसरी मात्रा परदेशात घेतली तर चालेल का असेही प्रश्न विद्यार्थी विचारू लागले आहेत.

‘केंद्र सरकारला विनंती करणार’

मुंबई महापालिके चे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता ते म्हणाले की, ८४ दिवसांच्या कालावधीमुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात येऊ शकते याची जाणीव आम्हाला आहे. त्यामुळेच आम्ही के ंद्र सरकारला हा कालावधी कमी करण्याची विनंती के ली आहे. अपवादात्मक परिस्थिती म्हणून या विद्यार्थ्यांसाठी हा कालावधी काही आठवडय़ांनी कमी करावा असे पत्रही आम्ही एक-दोन दिवसांत पाठवू, असेही ते म्हणाले. कोव्हॅक्सिनच्या दोन मात्रांमधील कालावधी कमी असला तरी या लशीला जागतिक आरोग्य संघटनेची परवानगी नसल्यामुळे अमेरिकसह काही देशांमध्ये या लशीला परवानगी नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोव्हिशल्डची लस द्यावी लागत असल्याचेही त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांची संख्या अधिक असून त्या तुलनेत लशीचा साठा मात्र उपलब्ध नाही. बुधवारी साठा अत्यल्प प्रमाणात असल्याने काहीच केंद्रे सुरू ठेवण्यात आली. यातील काही साठा या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केला आहे. उर्वरित विद्यार्थ्यांसाठी पुढील आठवडय़ात सोमवार ते बुधवार पूर्वनोंदणीशिवाय लसीकरण सुरू ठेवले जाईल. परदेशात जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना लस दिली जाणार असून विद्यार्थ्यांनी घाई करू नये.

सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका

आणखी आठवडाभर विलंब

परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांंसाठी आता पुढील आठवडय़ात सोमवार ते बुधवार लसीकरण करण्यात येणार असून त्यामुळे या आठवडय़ात ज्यांना लस मिळालेली नाही. त्यांना पुढील आठवडय़ापर्यंत लस घेण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. या विद्यार्थ्यांसाठी पालिकेने सोमवार ते बुधवार लसीकरण सुरू केले तरी सोमवारी आणि मंगळवार या दोन दिवसांत १८७५ विद्यार्थ्यांचेच लसीकरण होऊ शकले आहे. उपलब्ध लशीचा साठा मंगळवारी जवळपास संपत आल्याने बुधवारी या विद्यार्थ्यांना लस उपलब्ध करून देण्यासाठी पालिकेने काही लसीकरण केंद्रेदेखील बंद ठेवली आहेत. तिन्ही केंद्रांवर मिळून बुधवारी पालिकेने ९०० मात्रा उपलब्ध करून दिल्या, परंतु त्या तुलनेत विद्यार्थ्यांची संख्या मात्र अधिक असल्याने अनेकांना या आठवडय़ात लस मिळू शकली नाही. सोमवार ते बुधवार पूर्वनोंदणीशिवाय आणि गुरुवार ते शनिवार नोंदणी केलेल्यांचे लसीकरण असे नियोजन पालिकेच्या केंद्रावर केले आहे.