ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या (टीेमटी) थांब्यांवर तासन् तास बसच्या प्रतिक्षेत ताटकळत रहाणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी खूषखबर असून ‘टीएमटी’च्या ताफ्यात येत्या दोन महिन्यात तब्बल २३० नव्या बसगाडय़ा दाखल होणार आहेत. या बस खरेदीच्या कंत्राटास मंगळवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभागृहात आवाजी मतदानाने मंजुरी देण्यात आली.
या कंत्राटात ३० नव्या वातानुकूलित बसचा समावेश करण्यात आला असून त्या चालविण्यासाठी खासगी तत्त्वावर चालक नेमले जातील, अशी माहिती महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी पत्रकारांना दिली. या बसेस ताफ्यात दाखल होताच दुसऱ्या टप्प्यात आणखी २०० बसगाडय़ा भाडेतत्त्वावर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ठाणे, कळवा, मुंब्रा या शहरांमधील गल्लीबोळापर्यंत ‘टीएमटी’ची बस पोहोचेल, असे नियोजन केले जाणार आहे, असेही गुप्ता यांनी स्पष्ट केले.
ठाणेकरांच्या अंतर्गत वाहतुकीची धमनी मानली जाणाऱ्या ‘टीएमटी’ सेवेचे  तीन तेरा वाजले आहेत. परिवहनच्या ताफ्यात सध्या ३११ बस असल्या तरी त्यापैकी जेमतेम १८० बस कार्यरत असून ७० हून अधिक बसगाडय़ा भंगारात निघण्याच्या मार्गावर आहेत.  यावर उतारा म्हणून मध्यंतरी परिवहन उपक्रमाने घोडंबदर मार्गावर सेवा पुरविण्यासाठी २५ बसगाडय़ा भाडेतत्तवावर घेतल्या. मात्र, १० लाखांपेक्षा अधिक प्रवासी संख्या असलेल्या ठाण्यात भाडय़ाच्या बसही प्रवाशांची गरज भागवू शकल्या नाहीत. हे लक्षात घेऊन उशीरा का होईना ठाणे महापालिकेने पुढचे पाऊल टाकले असून केंद्र सरकारकडून मिळालेल्या सुमारे ६० कोटी ७५ लाख रुपयांच्या भरघोस मदतीच्या जोरावर २३० बसगाडय़ांच्या खरेदीचा निर्णय घेतला आहे.
यासंबंधीच्या अंतिम निविदेस मंगळवारी सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. या निर्णयानुसार ‘टीएमटी’च्या ताफ्यात १४० साध्या, तर ५० मिडी आणि ३० वातानुकूलित बसगाडय़ा दाखल होणार आहेत.   

टीएमटीचीही दादर बस!
टीएमटीच्या ताफ्यात भरती होणाऱ्या ३० वातानुकूलित बस या मुंबईतील दादर, वांद्रे, बोरिवली या मार्गाकडे सोडण्यात येणार आहेत. या बसचे चालक खासगी तत्त्वावर नेमले जाणार आहेत.
‘घोडबंदर’करांना दिलासा
घोडंबदर ते ठाणे रेल्वे स्थानक या मार्गावर धावणाऱ्या बेकायदा खासगी बसगाडय़ांना परवाने देऊन त्यांनाही ‘टीएमटी’च्या ताफ्यात दाखल करुन घेतले जाणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रियेनुसार प्रती किमी दरानुसार पैसे या वाहतूकदारांना मोजले जाणार आहेत.