ठाणे तुरुंगातून तळोजे तुरुंगात स्थलांतरित करा, अशी मागणी करीत एका कैद्याने रविवारी ठाणे तुरुंगात बराकीवर चढून गोंधळ घातला. ‘शोले’ पद्धतीच्या या गोंधळामुळे त्याची समजूत काढताना तुरुंग प्रशासनाचीही भंबेरी उडाली. अखेर अग्निशमन दलाच्या मदतीने पाच तासांनंतर त्याला खाली उतरवण्यात आले.
ठाणे तुरुंगात रविवारी दुपारी जेवणाच्या सुटीची संधी साधून प्रतीक नावाचा कैदी बराकीच्या भिंतीवर चढला. तेथील पाइपचा आधार घेत त्याने तुरुंग अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. आपणास तळोजे तुरुंगात पाठवा, असा धोशा त्याने लावला. प्रशासनाने प्रयत्न करूनही तो खाली उतरत नसल्याने पोलिसांनी अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण केले. त्यांनी शिडी लावून त्याला खाली उतरविण्याचा प्रयत्न केला. त्याची समजूत घालून त्याला खाली उतरण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना पाच तास परिश्रम घ्यावे लागले. या आरोपीवर तीन गुन्हे दाखल आहेत.