‘यंदाच्या गणेशोत्सवात चाकरमान्यांसाठी २००हून अधिक विशेष गाडय़ा’, अशी फुशारकी मारणाऱ्या रेल्वेचे नाक कोकण रेल्वेमार्गावर मालगाडी घसरल्याने कापले गेले. कोकण मार्गावरील वाहतुकीची रविवारपासून सुरू असलेली वाताहत अगदी गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशीपर्यंत सुरूच होती. मांडवी, कोकणकन्या या दोन महत्त्वाच्या गाडय़ांच्या वेळा बदलल्याने दोन महिन्यांपासून या दिवसाचे आरक्षण केलेल्या चाकरमान्यांचा आपल्या घरच्या गणपतीच्या पूजेचा मुहूर्त हुकलाच. त्याचप्रमाणे आपल्या गाडीच्या वेळेत विविध स्थानकांवर पोहोचलेल्या प्रवाशांनी वेळापत्रकातील फेरफारामुळे अखेर स्थानकांवरच पथाऱ्या पसरल्या होत्या. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या हालाला यंदा पारावारच उरला नाही.
कोकणात गणपतीच्या निमित्ताने जाणाऱ्या प्रवाशांच्या वाटय़ाला दरवर्षीच हालअपेष्टा वाढून ठेवलेल्या असतात. गेली दोन ते तीन वर्षे नेमके गणेशोत्सवाच्या काळातच कोकण रेल्वेमार्गावर या ना त्या कारणामुळे वाहतूक रखडते. यंदा तर कोकणातील प्रवाशांसाठी २०० हून अधिक विशेष गाडय़ा असल्याने कोकणवासीयांचा प्रवास सुखरूप आणि आरामदायक होणार असल्याच्या टिमक्या सर्वच रेल्वे प्रशासनांनी वाजवल्या होत्या. मात्र ही गाजराची पुंगी रविवारी रुळावरून घसरलेल्या मालगाडीखालीच तुटून पडली. रविवारपासून सुरू झालेले कोकणवासीयांचे हाल अगदी गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशीपर्यंत चालूच होते. तसेच खुद्द गणेश चतुर्थीच्या दिवशीही कोकणकन्या, मांडवी आणि दादर-रत्नागिरी पॅसेंजर या गाडय़ांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आल्याने चाकरमान्यांना आपल्या घरच्या गणपतीच्या पूजेला उपस्थित राहणे शक्य झाले नाही.
गुरुवारी गाडय़ा पूर्ववत होतील, या कोकण रेल्वेच्या आश्वासनावर विसंबून गुरुवारी अनेक प्रवासी आपल्या गाडीच्या वेळेत स्थानकांमध्ये पोहोचले. मात्र तरीही कोकण मार्गावरील सर्वच गाडय़ा तीन ते चार तास उशिराने धावत होत्या. मांडवी, कोकणकन्या आणि दादर-रत्नागिरी पॅसेंजर या गाडय़ा तर खूपच वेळासाठी पुढे ढकलण्यात आल्याने या गाडय़ांच्या हजारो प्रवाशांनी पुन्हा घरी परतायच्या ऐवजी प्लॅटफॉर्म आणि स्थानकांवरच पथाऱ्या पसरल्या होत्या. ठाणे, दादर, मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस, पनवेल या सर्वच ठिकाणी प्रवासी तळ ठोकून बसले होते. या प्रवाशांच्या खाण्यापिण्याचेच नाही, तर इतरही हाल होते.
स्वस्त, वेगवान आणि खात्रीदायक प्रवास म्हणून आम्ही दोन महिन्यांपूर्वी मोठय़ा मेहेनतीने शुक्रवारच्या मांडवी गाडीचे आरक्षण मिळवले होते. ही गाडी शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास सुटणे अपेक्षित होते. कोकण रेल्वेवरील गोंधळामुळे ती दुपारी ३.३५ वाजता सुटेल, असे सांगण्यात आले. त्यामुळे आम्ही दोनच्या सुमारास परत स्थानकात आलो. आता ही गाडी सात वाजता सोडणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आम्ही मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे तळ ठोकून बसल्याचे विनायक सावंत यांनी सांगितले.

कोकणवासीयांचे हाल कायम
नवी मुंबई  :कोकण रेल्वेच्या  कोलमडलेल्या वेळापत्रकामुळे अनेक कोकणवासीयांनी गुरुवारी खाजगी वाहन आणि एसटीचा आधार घेतला असला तरी त्यांचे हाल कायम आहेत. रस्ता वाहतुकीवरील ताण वाढल्याने पनवेल येथील पळस्पे फाटा आणि सायन-पनवेल महामार्गावर मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
कोकणाकडे जाण्यासाठी खाजगी बस मोठय़ा प्रमाणात सोडण्यात आल्या आहेत, तसेच अनेकांनी खाजगी वाहनांने कोकणाकडे मार्गक्रमण केले असल्याने सायन-पनवेल महामार्गावर मोठय़ा प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक पोलीसांनी कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांना पनवेलमध्ये प्रवेश न करता पळस्पे मार्गे आणि महामार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले होते. मात्र महामार्गावरील वाहतूक मंदावल्याने अनेक वाहनांनी पनवेल शहरात प्रवेश केल्याने मोठा कोंडीचा तिढा  वाढला होता. पळस्पे फाटा येथून मुंबई-गोवा महामार्गावर देखील हीच स्थितीत कायम होती.