गुजरातच्या निवडणुकीत निर्माण झालेले वातावरण आणि मतदानोत्तर चाचण्यांचा कौल यांचा कोठेही मेळ बसताना दिसत नाही. ‘ईव्हीएम’ मशिनमध्ये कोणताही गडबड नसेल तर दोन दिवसांनी ‘खरा निकाल’ दिसेलच असे ‘मार्मिक’ मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडले.

गुजरात विधानसभा निवडणुकीत पटेल समाजाचे आरक्षण, नोटाबंदी, जीएसटी आदी मुद्दय़ांमुळे मोठय़ा प्रमाणात मतदारांमध्ये नाराजी दिसत होती. जीएसटीनंतर सुरत तसेच अहमदाबादसह व्यापारी केंद्रांचे व्यवहार ठप्प झाले होते. जीएसटीविरोधात व्यापारी रस्त्यावरही उतरले होते, तर हार्दिक पटेल या तरुणाने गुजरातमधील वातावरण ढवळून काढले. कालपर्यंत राहुल गांधी यांना पप्पू म्हणणाऱ्या भाजपला राहुल गांधी यांना गंभीरपणे घ्यावे लागले. तब्बल दोन दशकांहून अधिक काळ सत्तेत असूनही गुतरातच्या निवडणुकीसाठी नरेंद्र मोदी यांना दोन डझनहून अधिक सभा घेऊन गुजरात पिंजून काढण्याची वेळ आली. अनेक केंद्रीय मंत्री तसेच भाजपशासित राज्याचे मुख्यमंत्री व मंत्री निवडणुकीनिमित्त तळ ठोकून बसले होते. एकीकडे हार्दिक पटेल यांच्या सभांना लाखांची गर्दी होताना दिसत होती तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाच्या वेळी लोक निघून जात आहेत, असे चित्र निर्माण झाले होते. या पाश्र्वभूमीवर माध्यमांनी भाजपला ९२ ते १२० जागा मिळतील असे मतदानोत्तर अंदाज वर्तविले आहेत.

गुजरातच्या रणधुमाळीचा फैसला सोमवारी होणार असून उद्धव ठाकरे यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले की, गुजरातचे वातावरण वेगळेच काही सांगत असून माध्यमांनी दाखवलेला कौल वेगळेच सांगत आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीनच्या घोटाळ्याच्या अनेक काहाण्या प्रसिद्ध झाल्या आहेत. तसा काही घोटाळा झाला नाही तर ‘खरा निकाल’ दिसेलच. माझा मुद्दा जरा वेगळा आहे तो म्हणजे मतदाराला ईव्हीएमचे बटण दाबल्यानंतर आपले मत खरेच योग्य पक्षाला गेले आहे अथवा नाही हे कळण्याचा हक्क आहे. तो कुठे तरी डावलला जाताना दिसतो. अनेक देशांमध्ये मतपत्रिकेद्वारे मतदानाची पद्धत आहे. अशा वेळी ईव्हीएम मशीनमुळे लगेचच निकाल जाहीर होत असला तरी त्यात गडबड झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवालही त्यांनी केला. मुंबई विद्यापीठाचे पेपर तपासणी व निकाल ऑनलाइन केल्याचा फटका लाखो विद्यार्थ्यांना बसला, परंतु याची जबाबदारी घेण्यास सरकारमधील कोणीही तयार नाही. शेतकरी कर्जमुक्तीच्या घोषणा झाल्या व त्यानंतर ऑनलाइन अर्ज भरण्यास सांगण्यात आले. त्यातही घोळ झाला असून त्याची जबाबदारी कोणीही घेण्यास तयार नाही अशी टीका त्यांनी केली.