विद्यापीठाच्या दिरंगाईचा विद्यार्थ्यांना फटका;निकाल हाती नसल्याने पुढील प्रवेश रद्द होण्याची भीती

राज्यपालांनी दिलेल्या ३१ जुलैपर्यंतच्या मुदतीमध्ये तरी निकाल जाहीर होतील, अशी आस लावून उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या विद्यार्थ्यांच्या आशांवर सोमवारी पाणी फिरले. परदेशातील विविध विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी निकालाची सद्य:स्थिती जाणून घेण्यासाठी मंगळवारी अखेर विद्यापीठाकडे धाव घेतली. हातात निकालपत्र असल्याखेरीज परदेशी जाण्यासाठी आवश्यक असलेल्या व्हिसाकरिता अर्ज करणेही शक्य नसल्याने या विद्यार्थ्यांची कोंडी झाली आहे.

पदव्युत्तर शिक्षणासाठी राज्याबाहेरील तसेच परदेशातील विविध विद्यापीठांमध्ये जाऊ इच्छिणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य पणाला लागले आहे. विद्यापीठ ३१ जुलैपर्यंत निकाल जाहीर करेल अशी आशा घेऊन बसलेल्या या विद्यार्थ्यांना मुदतीअखेरही निकाल जाहीर न झाल्याने काय करावे हेच सुचेनासे झाले आहे. विनंती करून तरी आपले निकाल पुढील दोन दिवसांत मिळवता येतील का, या विचाराने या विद्यार्थ्यांनी मंगळवारी विद्यापीठातील मदत केंद्रावर गर्दी केली होती; परंतु तिथेही त्यांना वाट पाहण्याव्यतिरिक्त दुसरा कोणताही पर्याय मिळालेला नाही. परदेशातील बहुतांश विद्यापीठांचे अभ्यासक्रम हे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात सुरू होत आहेत. नियमानुसार, विद्यार्थ्यांना गुणपत्रिकाची प्रत दाखविल्याशिवाय व्हिसासाठी अर्ज करता येत नाही. व्हिसा मिळण्यासाठी २० ते ३० दिवसांचा अवधी लागतो. तेव्हा या वेळापत्रकानुसार या विद्यार्थ्यांना या आठवडय़ातच व्हिसा करावा लागेल; परंतु अजून उत्तरपत्रिकांची तपासणीच झालेली नाही. तिथे गुणपत्रिका कुठून मिळणार? अशी परिस्थिती उद्भवल्याने एकीकडे वर्ष वाया जाण्याची भीती आहे तर दुसरीकडे प्रवेशासाठी भरलेले लाखो रुपयांचा फटकाही सहन करावा लागणार या विचाराने हे विद्यार्थी आता अत्यंत मानसिक तणावाखाली आहेत.

प्रीती शर्माने कला शाखेची पदवीची परीक्षा दिलेली आहे. तिने आर्यलड येथील बर्मिगहॅम या विद्यापीठामध्ये पत्रकारिता विषयामध्ये उच्च शिक्षणासाठी पाच लाख रुपये शुल्क भरुन प्रवेश घेतला आहे. परंतु कला शाखेचा निकालच घोषित न झाल्याने तिला व्हिसासाठी अर्ज करणे अशक्य झालेले आहे. पर्यावरण व्यवस्थापन विषय घेऊन ‘बीएएमस’ करणाऱ्या पाखी दासने स्कॉटलंडमधील ग्लास्गो विद्यापीठामध्ये पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला आहे. येत्या ७ ऑगस्टपर्यंत गुणपत्रिका

मिळाली नाही तर वेळेत व्हिसाला अर्ज न केल्याकारणास्तव तिचा प्रवेश रद्द करण्यात केला जाणार आहे.

पाखीने परीक्षा दिलेल्या विषयाची परीक्षा दिलेले सुमारे १०० विद्यार्थी आहेत. त्यामुळे विद्यापीठाने किमान आमचा तरी निकाल पुढील दोन दिवसांत जाहीर करावा, असे पाखीने व्यक्त केले आहे.

वाणिज्य शाखेतील पदवी परीक्षा दिलेल्या अंजली भानोत या विद्यार्थिनीने लंडन येथील वेस्टमिनिस्टर विद्यापीठामध्ये पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला आहे.

मोठय़ा प्रयत्नांनी तिला उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्तीही मिळाली; परंतु निकाल रखडल्याने ती हैराण झाली आहे.

या वेळी प्रवेश रद्द झाल्यास पुढच्या वेळी तिला उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळू शकणार नाही. कला शाखेची परीक्षा दिलेल्या संदेश झा या विद्यार्थ्यांची दिल्ली विद्यापीठामध्ये विधिच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी निवड झालेली आहे.

त्याला प्रवेशाची अंतिम मुदत वाढवून पाच ऑगस्टपर्यंत देण्यात आली आहे; परंतु या कालावधीतही निकाल लागण्याची शक्यता नसल्याने सिद्धार्थ फारच हताश झाला आहे. सिद्धार्थ नाचणकरने केमिकल इंजिनीअरिंग शेवटच्या वर्षांची परीक्षा दिलेली आहे.

जर्मनीतील टेक्निकल विद्यापीठामध्ये त्याने उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतलेला आहे. या आठवडाभरामध्ये व्हिसासाठी अर्ज केला नाही तर त्याचा प्रवेश रद्द करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी सूत्रांनी बोलताना दिली.

मी सिव्हिल इंजिनीअरिंगची शेवटच्या वर्षांची परीक्षा दिली आहे. मला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाची केंद्रीय परीक्षा द्यायची आहे. ही परीक्षा देण्यासाठी पदवीचा निकाल हा १ ऑगस्ट किंवा त्यापूर्वी जाहीर झालेला असणे बंधनकारक आहे. या परीक्षेची पूर्वपरीक्षा १७ ऑगस्टला आहे. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी करण्यात येते. या पडताळणीमध्ये माझ्या निकालावर जर १ ऑगस्टनंतरची तारीख असेल तर मी या परीक्षेतून बाद होणार आहे.

– अक्षय रायकर, विद्यार्थी