News Flash

गिरगाव चौपाटीवर दर्शक गॅलरी

दक्षिण मुंबईतील गिरगाव चौपाटीवर पालिकेच्या वतीने नवीन प्रेक्षक गॅलरी उभारण्यात येणार आहे.

गिरगाव चौपाटीवर दर्शक गॅलरी

तीन महिन्यांत पर्यटकांसाठी खुली

मुंबई : दक्षिण मुंबईतील गिरगाव चौपाटीवर पालिकेच्या वतीने नवीन प्रेक्षक गॅलरी उभारण्यात येणार आहे. या प्रेक्षक गॅलरीचे शुक्रवारी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. येत्या तीन महिन्यांत ही दर्शक गॅलरी तयार होणार असून या गॅलरीत उभे राहून पर्यटकांना मरिन ड्राइव्हवरील ‘राणीचा रत्नहार’देखील न्याहाळता येणार आहे.

पालिके च्या निवडणुका जवळ आल्यामुळे मुंबईत विविध ठिकाणी विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण यांना वेग आला आहे. मलबार हिल, ग्रॅण्ट रोड, ताडदेवचा भाग असलेल्या डी विभागात शुक्रवारी अशाच दोन कामांना सुरुवात करण्यात आली. त्यात गिरगाव चौपाटी येथील दर्शक गॅलरीचे भूमिपूजन व हाजी अली येथील कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पाचे लोकार्पण पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी महापौर किशोरी पेडणेकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत, सी व डी प्रभाग समिती अध्यक्षा मीनल पटेल, स्थानिक नगरसेविका ज्योत्स्ना मेहता, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार, उपआयुक्त विजय बालमवार, ‘डी’ विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड उपस्थित होते.

मुंबईतील पर्यटनस्थळांमध्ये एक महत्त्वाचे आकर्षण असणाऱ्या आणि राणीचा रत्नहार अशी ओळख असणाऱ्या मरिन ड्राइव्ह अर्थात नेताजी सुभाष मार्गालगत लवकरच एक नवे पर्यटनस्थळ आकारास येणार आहे. गिरगाव चौपाटीच्या उत्तर टोकाला कविवर्य भा. रा. तांबे चौकालगत समुद्राचे आणि मरिन ड्राइव्हचे वैशिष्टय़पूर्ण व मनमोहक दर्शन घडविणारी दर्शक गॅलरी उभारण्यात येणार आहे. तांबे चौकालगत पावसाचे पाणी समुद्रात वाहून नेणारी पालिकेची पर्जन्य जलवाहिनी आहे. याच पर्जन्य जलवाहिनीच्या वर सुमारे ४७५ चौरस मीटर आकाराची दर्शक गॅलरी उभारण्यात येणार आहे.

भरती-ओहोटी, समुद्राच्या लाटांची उंची व दाब आदी सर्व बाबींचा शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करून ही गॅलरी उभारण्यात येणार आहे. ही गॅलरी उभारण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व संबंधित परवानग्या यापूर्वीच प्राप्त झाल्या असून पुढील साधारणपणे तीन महिन्यांत ही गॅलरी पूर्ण करण्याचे पालिकेचे उद्दिष्ट आहे.

कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प कार्यान्वित

या कार्यक्रमानंतर हाजी अलीजवळील केशवराव खाडय़े मार्गालगत उभारण्यात आलेल्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पाचे लोकार्पणही आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकल्पांतर्गत दररोज दोन हजार किलो कचऱ्यापासून प्रथम गॅसनिर्मिती करण्यात येईल. त्यानंतर या गॅसचा उपयोग करून जनित्राच्या आधारे वीजनिर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पातून दररोज साधारणपणे २५० ते ३००युनिट वीजनिर्मिती होईल, अशी अपेक्षा आहे. सुरुवातीच्या टप्प्यात महापालिकेच्या एका उद्यानात व घनकचरा व्यवस्थापन खात्याच्या एका कचरा विलगीकरण केंद्रात या विजेचा वापर केला जाणार आहे. या प्रकल्पामुळे महापालिकेच्या वीज खर्चात आंशिक बचत होण्यासह कचरा वाहून नेण्याच्या खर्चात बचत करणे शक्य होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2021 1:41 am

Web Title: viewer gallery at girgaum chowpatty ssh 93
Next Stories
1 वसई-विरार, मीरा-भाईंदर शहरांना पुढील वर्षांपासून अतिरिक्त पाणीपुरवठा
2 भविष्यनिर्वाह निधीवरही कर
3 शोध भवतालातील स्त्रीशक्तीचा
Just Now!
X