पाणी विकत घ्यावे लागल्याची अधिकारी व कर्मचाऱ्यांची तक्रार
नागपूर मुक्कामी सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी शासकीय कार्यालये व विश्रामगृहांमध्ये लाखो रुपये खर्च करून बसविण्यात आलेली नवीन जलशुद्धीकरण यंत्रे (वॉटर प्युरिफाइंग मशीन्स) अधिवेशन संपत आले तरी अजून सुरू करण्यात आलेली नाहीत. परिणामी पिण्यासाठी बाहेरून विकत पाणी आणावे लागते, अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तक्रारी आहेत.
मात्र, मशीन्स सुरू आहेत, कदाचित त्या वापरत नसतील म्हणून बंद दिसत असतील, असा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. एम. मिश्रा यांनी केला.
विधिमंडळ अधिवेशनासाठी मंत्रालयातून तसेच राज्यातील विविध विभागांमधील व कार्यालयांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मुक्काम नागपूरला हलतो. नागपूरमध्ये हैदराबाद हाऊसमध्ये विविध विभागांची अधिवेशनाच्या कालावधीसाठी शिबीर कार्यालये सुरू केलेली असतात. रवी भवन या राज्यातील सर्वात मोठे शासकीय विश्रामगृहात अधिकारी व कर्मचाऱ्यांची राहण्याची सोय केली जाते. सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने हैदराबाद हाऊसमध्ये शासकीय कार्यालये सुरू आहेत व रवी भवनमध्ये मोठय़ा संख्येने अधिकारी व कर्मचारी राहत आहेत.
अधिवेशनाच्या आधीच हैदराबाद हाऊसमध्ये व रवी भवनमध्ये लाखो रुपये खर्च करून पिण्याच्या पाण्यासाठी पाणी शुद्धीकरण यंत्रे बसविली आहेत.
उच्च व उत्तम दर्जाची ही यंत्रे आहेत, परंतु अधिवेशन संपत आले तरी अजून ती चालूच करण्यात आलेली नाहीत, अशी तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांची तक्रार आहे. नव्याने बसविण्यात आलेल्या त्या यंत्रांवरील पॅकिंग असलेला प्लास्टिकचा कागदही काढलेला नाही. यंत्रे बंद असल्यामुळे शुद्ध पाण्यासाठी बाहेरून पाण्याच्या बाटल्या विकत आणाव्या लागत असल्याचे सांगण्यात येते. या संदर्भात कार्यकारी अभियंता व्ही.एम. मिश्रा यांच्याशी संपर्क साधला असता, रवी भवनमधील यंत्रे सुरू आहेत, हैदराबाद हाऊसमधील यंत्रे वापरली जात नाहीत, त्यामुळे बंद असावीत, असा दावा त्यांनी केला. पूर्वी पिण्याच्या पाण्यासाठी पाण्याच्या बाटल्या पुरविल्या जात होत्या, परंतु त्याचा हिशेब ठेवणे अवघड होते, तसेच ते खर्चीक होते, त्यामुळे पाणी शुद्धीकरणाची यंत्रे बसविण्यात आली आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.