पश्चिम रेल्वेमार्गावर रविवारी ओव्हरहेड यंत्रणा आणि सिग्नल यंत्रणेच्या दुरुस्ती-देखभालीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने बोरिवली आणि गोरेगाव रेल्वे स्थानकांदरम्यान पाच तासांसाठी जम्बो मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे, तर मध्य रेल्वेवरही कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान दुरुस्तीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बरवरही मेगा ब्लॉक असल्याकारणाने सकाळी ११ ते दुपारी ३ या काळात सीएसटी ते पनवेल, वाशी आणि बेलापूरदरम्यान कुठल्याही लोकलगाडय़ा धावणार नसल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.
पश्चिम रेल्वेवर कुठे?
बोरिवली ते गोरेगाव अप आणि डाऊन धीमा मार्ग ’कधी – सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ ’परिणाम – मेगा ब्लॉकमुळे सकाळी १०.३५ पासून ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत बोरिवली आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दिशेच्या गाडय़ा जलद मार्गावरून धावतील. या दरम्यान बोरीवली, भाईंदर, वसई रोड, विरार किंवा डहाणू रोड येथून येणाऱ्या किंवा सुटणाऱ्या जलद गाडय़ा अंधेरी ते बोरिवली प्रवासात सर्व स्थानकांवर थांबतील. तसेच बोरिवलीत प्लॅटफॉर्म क्रमांक ३, ४, ५, ६ आणि ६ए यापैकी कुठेही गाडय़ा आणण्यात येतील, याची नोंद घ्यावी, असे पश्चिम रेल्वेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
मध्य रेल्वेवर कुठे?
कल्याण ते ठाणे अप जलद मार्ग ’कधी – सकाळी ११.१० ते दुपारी ३.४० ’परिणाम – मेगा ब्लॉकमुळे सकाळी ११.२२ पासून ते दुपारी ३.४२ वाजेपर्यंत कल्याण येथून सुटणाऱ्या अप दिशेच्या जलद गाडय़ा कल्याण ते ठाणेदरम्यान धिम्या मार्गावरून वळवण्यात येतील आणि सर्व स्थानकांमध्ये थांबतील. ठाण्यानंतर त्या जलद मार्गावरून प्रवास करतील, तर सकाळी १०.०४ ते दुपारी २.४२ पर्यंत सीएसटीहून सुटणाऱ्या डाऊन दिशेच्या सर्व जलद लोकल्स त्यांच्या निर्धारित स्थानकांबरोबरच घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्थानकांवर थांबवण्यात येतील. यामुळे सीएसटीकडे जाणाऱ्या आणि तिथून सुटणाऱ्या सर्व गाडय़ा निर्धारित वेळेपेक्षा १५ ते २० मिनिटे उशिराने धावतील. रत्नागिरी-दादर पॅसेंजरही रविवारी दिवा स्थानकात थांबवली जाईल आणि दिव्यातूनच ही गाडी रत्नागिरीसाठी रवाना होईल, असे मध्य रेल्वेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
हार्बर रेल्वेवर कुठे?
कुर्ला ते मानखुर्द अप आणि डाऊन मार्ग ’कधी – सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० ’परिणाम – मेगा ब्लॉकमुळे सकाळी १०.२० पासून ते दुपारी ३.०१ वाजेपर्यंत सीएसटीहून पनवेल, बेलापूर आणि वाशीकरिता सुटणाऱ्या डाऊन दिशेच्या तसेच अप दिशेच्या गाडय़ांची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. मेगा ब्लॉकदरम्यान, सीएसटीहून कुर्ला, मानखुर्द आणि पनवेलसाठी काही विशेष गाडय़ा सोडण्यात येतील. या काळात सकाळी १० पासून ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत हार्बरच्या प्रवाशांना ट्रान्सहार्बर लाइन आणि मेन लाइनने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.