मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं सरकार आल्यास व्याजासह हिशोब चुकता करु, असा इशारा मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी कारवाई करणाऱ्यांना दिला आहे. सविनय कायदेभंग करीत रेल्वे प्रवास केल्याप्रकरणी देशपांडे यांच्यासह मनसेच्या इतर नेत्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्या सुनावणीसाठी ते कल्याण एसीपी कार्यालयात हजेरी लावली. यावेळी देशपांडे माध्यमांशी बोलत होते.

संदीप देशपांडे म्हणाले, “आम्ही सविनय कायदेभंग आंदोलन मुंबईकरांच्या हितासाठी केलं होतं. मात्र, आमच्यावर कारवाई करताना अधिकारी आता कायद्याची प्रक्रिया पार पाडत आहेत. मात्र, त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी की, मनसे अध्यक्ष राज साहेबांचं सरकार येईल तेव्हा सर्व हिशोब व्याजासकट चुकता होईल. आता जे लोक आम्हाला त्रास देत आहेत त्यांची आम्ही नोंद करु ठेऊ”

त्याचबरोबर “सरकारने कानात कापसाचे बोळे घातले आहेत का? असा सवाल करीत हायकोर्टाने कान टोचल्यानंतर तरी सरकारनं आता सुधारलं पाहिजे. लोकांचे प्रचंड हाल, उपासमार होत आहे, हीच बाब हायकोर्टाने देखील नोंदवली आहे. सरकार सध्या घरात बसून आपली जबाबदारी सांभाळत आहे,” अशा शब्दांत त्यांनी राज्य शासनावर निशाणा साधला.

मुंबईकरांसाठी लोकल सेवा सुरु करावी या मागणीसाठी २१ सप्टेंबर रोजी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे, नेते संतोष धुरी, गजानन काळे, अतुल भगत यांनी रेल्वे प्रवास करीत सविनय कायदेभंग आंदोलन केले होते. दरम्यान, शासन आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी, विना तिकीट प्रवास केल्याप्रकरणी तसेच रेल्वेच्या इतर कलमांतर्गत या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. संदीप देशपांडेंसह मनसे नेत्यांना यावेळी अटक होऊन जामिनावर सुटकाही झाली होती.