लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : उत्तर मुंबईतील मढ, मालवणी, मनोरी भागातील दूरवस्थेत असलेले ११ तलाव पुनरुज्जीवित करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. तलावांच्या दूरवस्थेमुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान लक्षात घेऊन हा उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. येत्या दोन वर्षांमध्ये सर्व तलावांचे सुशोभीकरण करून नागरिकांसाठी ते खुले करण्यात येणार आहेत. सामाजिक उत्तरदायित्व निधीतून या तलावांचे पुनरुज्जीवन आणि सुशोभीकरण करण्यात येणार असून यासाठी विविध स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात येणार आहे.

उत्तर मुंबईत सुरू असलेली विविध विकासकामे, नागरी सेवा सुविधांबाबत केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी नुकतीच आढावा बैठक घेतली होती. त्या बैठकीत तलावांच्या पुनरुज्जीवनाबाबत चर्चा करण्यात आली. उत्तर मुंबईतील अनेक तलावांची देखरेख आणि देखभालीअभावी दूरवस्था झाली आहे. परिणामी, जैवविविधतेलाही धोका निर्माण झाला असून शहराचेही विद्रुपीकरण होत आहे. ही बाब लक्षात घेऊन महानगरपालिकेने तलावांचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतला आहे. सद्यस्थितीत संबंधित तलाव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे असून ते महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याची सूचना पीयूष गोयल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला केली आहे.

मढ, मालवणी, मनोरी या भागातील लोटस, भुजले, हरबादेवी, सुमलई, वनाला, पोसई, धारवली, कजरादेवी, अली, गावदेवी, पाथेरवाडी या तलावांचे पुनरुज्जीवन आणि सुशोभीकरण करण्यात येणार आहे. बहुतांश ठिकाणी अतिक्रमण झाल्यामुळे तलाव नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. तलावात वाढलेल्या जलपर्णी, शेवाळे, गाळ वेळोवेळी काढण्याची गरज आहे. मात्र, उत्तर मुंबईतील ११ तलावांची योग्य देखभालीअभावी दुर्दशा झाली आहे. तलावातील अस्वच्छ पाण्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. तर, अनेक ठिकाणी अतिक्रमण केल्यामुळे तलावांची दूरवस्था झाली आहे. त्यामुळे तलावातील जैवविविधता धोक्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संबंधित तलावांचे संवर्धन करण्याबाबत यापूर्वीही प्रयत्न करण्यात आले होते. मात्र, ते अयशस्वी ठरले. मात्र, आता पीयूष गोयल यांनी तलावांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. या तलावांचे पुनरुज्जीवन झाल्यांनतर सुशोभीकरणाचेही काम हाती घेण्यात येणार आहे. त्यांनतर नागरिक व पर्यटकांसाठी हे तलाव खुले करण्यात येतील, असे गोयल यांनी सांगितले.