नियमित गाडय़ांबरोबर दिवाळीत जादा बस सोडल्याने प्रवाशांनी एसटीला चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे ११ नोव्हेंबरपासून दहा दिवसांत ११० कोटींचा महसूल महामंडळाच्या तिजोरीत जमा झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोना व टाळेबंदीमुळे प्रवासी उत्पन्न नसल्याने एसटीला आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. टाळेबंदीपूर्वी एसटीतून दररोज ६४ लाख प्रवासी प्रवास करत होते. तर उत्पन्न २२ कोटी रुपये होते. परंतु, करोनाच्या धास्तीने एसटीपासून प्रवासी दुरावलेला आहे. दिवाळीपूर्वी १ ते १० नोव्हेंबपर्यंत दररोज सरासरी १० हजार ५०० बसमधून १३ लाख ३८ हजार प्रवासी प्रवास करत होते. त्यामुळे दररोज ७ कोटी ५० लाख रुपये उत्पन्न एसटीच्या तिजोरीत जमा होत होते.

दिवाळीनिमित्त एसटी महामंडळाने ११ नोव्हेंबरपासून दररोज १ हजार जादा बस सोडण्यास सुरुवात केली. त्याला प्रतिसाद चांगला मिळाला आणि दररोजच्या उत्पन्नात ३ ते साडेतीन कोटी रुपयांची भर पडली. त्यामुळे महामंडळाला ११ ते २० नोव्हेंबपर्यंत ११० कोटी रुपये उत्पन्न मिळाल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

शाळा-मंदिरे सुरू झाल्याचा फायदा

दिवाळीनंतर नववी ते बारावी शाळेचे वर्ग सुरूझाल्यामुळे, राज्यभरातील प्रार्थनास्थळेही उघडल्यामुळे एसटीची प्रवासी संख्या व उत्पन्न वाढल्याची शक्यता आहे. जिथे जिथे शाळा सुरू झाल्या आहेत, तेथे व्यवस्थापनाच्या मागणीनुसार विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी शालेय फेऱ्यांची व्यवस्थाही एसटीकडून करण्यात येत आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 110 crore income to st in ten days abn
First published on: 26-11-2020 at 00:26 IST