मुंबई : राज्यात जागतिक बँकेच्या अर्थ सहाय्याने बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) सुरू आहे. सुरुवातीपासून रडतखडत आणि अत्यंत संथगतीने प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू आहे. प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांचे परदेश दौरे जोरात सुरू आहेत. नुकते दोन अधिकाऱ्यांचा दक्षिण कोरिया दौरा झाला आहे. आता तब्बल १२ अधिकारी सुमारे १.७५ कोटी रुपयांचा चुराडा करून २३ दिवसांच्या नेदरलॅण्ड दौऱ्यावर जाणार आहेत.

राज्यातील अल्पभूधारक शेतकरी आणि कृषी नव उद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून सर्वसमावेश आणि स्पर्धात्मक शेतीमाल मूल्य साखळ्यांच्या विकासाला मदत करण्यासाठी राज्यात स्मार्ट प्रकल्प सुरू आहे. प्रकल्पातील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी स्मार्ट, कृषी विकास प्रतिष्ठान, बारामती आणि व्हीएचएल युनिव्हसिर्टी ऑफ अपलाईड सायन्स नेदरलॅण्ड, या संस्थेसोबत करार करण्यात आलेला आहे. त्या अंतर्गत १३ सप्टेंबर ते ५ ऑक्टोंबर या २३ दिवसांचा अभ्यास आणि प्रशिक्षण दौऱ्यासाठी स्मार्टचे कर्मचारी नेदरलॅण्ड दौऱ्यावर जात आहेत.

काही दिवसांपूर्वी प्रकल्पातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जागतिक बँकेच्या निधीतून दक्षिण कोरियांचा दौरा केला आहे. विशेष म्हणजे वर्ष, दीड वर्षांनंतर निवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांनी दक्षिण कोरियाचा दौरा केला आहे. आताही मूल्य साखळीच्या विकास करण्याच्या नावाखाली १२ अधिकारी नेदरलॅण्डच्या दौऱ्यावर जात आहे. स्मार्ट प्रकल्पाची सुरुवात करोना टाळेबंदीच्या काळात झाल्यामुळे पहिल्यापासून प्रकल्पाची वाटचाल संथगतीने सुरू आहे. त्यानंतर अधिकार विभागाणीच्या नावाखाली निर्णय प्रक्रिया ठप्प होती. आता प्रकल्पाने काहीशी गती घेतली आहे. पण, त्याचा शेतकरी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना फायदा होण्यापेक्षा प्रकल्पातील अधिकाऱ्यांच जास्त होत आहे. प्रकल्पाला मंजूर असलेल्या निधीतूनच हे परदेश दौरे होत आहेत.

परदेश दौऱ्यांचा उपयोग किती ?

दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावरून आलेले अधिकारी वर्ष, दीड वर्षांत निवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांनी दौऱ्यावर जाऊन मिळविलेल्या ज्ञानाचा प्रकल्पाला किती आणि किती दिवस लाभ होणार यावर प्रश्नचिन्ह निर्माण होते. आता नेदरलॅण्ड दौऱ्यावर तब्बल १२ अधिकारी जात आहे. हे बारा अधिकाऱ्यांपैकी काही अधिकारी कृषी विभागाशिवाय अन्य विभागातून प्रतिनियुक्तीवर आलेले आहेत. तर काही अधिकाऱ्यांना पदोन्नती झाल्यानंतर अन्य विभागात जावे लागणार आहे. त्यामुळे परदेश दौऱ्यांचा कृषी विभागाला, स्मार्ट प्रकल्पाला किती उपयोग होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

तरुण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संधी

स्मार्ट मधील अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी त्रिपक्षीय करार करण्यात आला आहे. त्याअंतर्गत १२ अधिकारी नेदरलॅण्डच्या अभ्यास आणि प्रशिक्षण दौऱ्यावर जात आहेत. प्रकल्पातील तरुण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संधी दिली आहे. या अभ्यास दौऱ्याचा स्मार्ट प्रकल्पाला, शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल, असे मत स्मार्ट प्रकल्प संचालक डॉ. हेमंत वसेकर यांनी व्यक्त केले.