१५ डबा लोकलच्या वाढीव फेऱ्यांचे स्वप्न धूसर

मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावर नऊ वर्षांपूर्वी पहिली १५ डब्यांची लोकल दाखल झाली.

१५ डबा लोकलच्या वाढीव फेऱ्यांचे स्वप्न धूसर
(संग्रहीत छायाचित्र)

मुंबई : मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावर नऊ वर्षांपूर्वी पहिली १५ डब्यांची लोकल दाखल झाली. मात्र त्यानंतर आजतागायत या लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करणे रेल्वेला शक्य झालेले नाही. या लोकलच्या वाढीव फेऱ्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी आणखी तीन ते चार वर्षे लागण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेवर कल्याण यार्डचे नूतनीकरण, कल्याण-कसारा तिसरी-चौथी मार्गिका, कल्याण-बदलापूर तिसरी-चौथी मार्गिका सेवेत दाखल झाल्यानंतरच १५ डब्यांच्या लोकलची संख्या आणि फेऱ्या वाढू शकेल, असे मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मध्य रेल्वेच्या ताफ्यात सध्या दोन १५ डब्यांच्या लोकल आहेत. मध्य रेल्वेवर नऊ आणि नंतर १२ डब्यांच्या लाेकल धावत होत्या. दरम्यान, प्रवासी वाहून नेण्याच्या क्षमतेत आणखी वाढ करता यावी, तसेच लोकलचा प्रवास सुकर व्हावा यासाठी  २०१३ मध्ये १५ डब्यांच्या लोकल सेवेत दाखल करण्यात आली. १२ डब्यांच्या लोकलच्या तुलनेत १५ डब्यांच्या लोकलमधून प्रवासी वाहून नेण्याच्या क्षमतेत २५ टक्क्यांनी वाढ झाली.  त्यामुळे सुरुवातीला ही लोकल सीएसएमटी ते कल्याण मार्गावर धावत होती. या लोकलच्या १६ फेऱ्या होत होत्या. मार्च २०१९ मध्ये या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आणि त्यात आणखी सहा फेऱ्यांची भर पडली. त्यामुळे दैनंदिन फेऱ्यांची संख्या २२ वर पोहोचली. मात्र तीन वर्षे उलटल्यानंतरही या फेऱ्यांमध्ये आणखी वाढ करता आलेली नाही.

मेल, एक्स्प्रेस गाड्यांमुळे लोकलच्या वेळापत्रकावर होणारा परिणाम लक्षात घेऊन कल्याण रेल्वे स्थानकात लांबपल्ल्याच्या गाडय़ांसाठी स्वतंत्र फलाट उभारण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला. कल्याणपासून सीएसएमटीपर्यंत किंवा पुन्हा कल्याणपर्यंत मेल, एक्स्प्रेस येताच त्यांच्यासाठी जलद लोकल थांबविण्यात येतात. त्याचा परिणाम जलद लोकलच्या वेळापत्रकावर होतो आणि त्या विलंबाने धावतात. कल्याण स्थानकात सध्या सात फलाट असून यापैकी फलाट क्रमांक दोन – तीन, चार – पाच तसेच सहा – सात  हे सामायिक आहेत. यापैकी फलाट क्रमांक चार -पाच आणि सहा – सातवर लांबपल्ल्याच्या गाड्या येतात. तर फलाट क्रमांक पाचवरून सीएसएमटीला आणि फलाट क्रमांक चारवरून खोपोली, कसारासाठी जलद लोकलही धावतात. कल्याण स्थानकातील केवळ एका फलाटावरून सीएसएमटीसाठी लोकल सोडण्यात येतात. त्यामुळे लांबपल्ल्याच्या गाडय़ांसाठी स्वतंत्र फलाट उभारण्यात आल्यानंतर लोकलचा प्रवास सुकर होईल, अशी आशा आहे. हे काम पूर्ण होण्यास तीन ते चार वर्षे लागणार आहेत. सहा वर्षांपासून चर्चेत असलेल्या कल्याण – कसारा तिसऱ्या मार्गिकेचे काम अद्याप रखडलेले आहे. या मार्गाचे फक्त ४० टक्के काम पूर्ण झाले असून या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यामधील कल्याण – आसनगावदरम्यानचे काम दोन वर्षांत पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.  त्यानंतर पुढील टप्पाचे काम हाती घेण्यात येणार आहे. सध्या कल्याण – कसारा दोनच मार्ग आहेत. तर कल्याण – बदलापूर तिसरा-चौथा मार्ग एमयूटीपी-३ ए अंतर्गंत येत असून त्याचेही काम पूर्ण होण्यासाठी तीन ते चार वर्षे लागणार आहेत.

कल्याण यार्डचे नूतनीकरण, कल्याणच्या पुढे तिसरी-चौथी मार्गिका उपलब्ध झाल्यानंतरच १५ डब्यांच्या लोकलची संख्या आणि फेऱ्या वाढवता येतील. सध्या तरी १५ डब्यांच्या लोकलच्या फेऱ्या वाढविण्याचा विचार नसल्याचे मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल यांनी स्पष्ट केले.

पश्चिम रेल्वेवरील १५ डबांच्या फेऱ्यांमध्ये वाढ

पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते विरार, डहाणूपर्यंत १५ डब्यांची लोकल धावते. या लोकलला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सेवेचा विस्तारही पश्चिम रेल्वेने केला. याशिवाय अंधेरी – विरारदरम्यानचा प्रवास सुकर करण्यासाठी  धिम्या मार्गावर १५ डब्यांच्या लोकल चालविण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार या दोन स्थानकांदरम्यान फलाटांची लांबी वाढविण्याबरोबरच अन्य तांत्रिक कामे पूर्ण करण्यात आली आहेत.  एप्रिल २०२१ मध्ये या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. सध्या १५ डब्यांच्या लोकल फेऱ्यांची एकूण संख्या ७९ असून आणखी २७ फेऱ्यांचे नियोजन पश्चिम रेल्वेने केले आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 15 coach local rounds central railway suburban line mumbai print news ysh

Next Story
पोलिसांवर हल्ला करणार्‍या चार महिलांना अटक
फोटो गॅलरी