अवघ्या १० दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाची मुंबईत जोरदार तयारी सुरू आहे. यंदा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने यंदा कृत्रिम तलावांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला असून संपूर्ण मुंबईत १५० कृत्रिम तलाव उपलब्ध करण्यात येणार आहेत.
हेही वाचा- मुंबई: मध्य रेल्वेलाही मिळणार चार ‘वंदे भारत एक्स्प्रेस’
केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाने पर्यावरणाचे होणारी हानी लक्षात घेऊन पीओपीवर बंदी घातली आहे. मात्र गेल्या दोन वर्षांमध्ये बंदी आदेशांची अंमलबजावणी होऊ शकली नाही. यंदा जवळ आलेला गणेशोत्सव आणि मूर्तिकारांनी तयार केलेल्या पीओपीच्या गणेशमूर्ती लक्षात घेऊन त्यांचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. मुंबईमधील घरगुती गणपतींची संख्या लक्षात घेऊन पीओपीच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गतवर्षी मुंबईत ८८ कृत्रिम तलावांमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. यंदा घातलेले बंधन लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने ठिकठिकाणी एकूण १५० कृत्रिम तलाव उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
भाविकांना या मूर्तींवर ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ असे ठळकपणे नमूद करावे लागणार आहे. पीओपीची मूर्ती झटकन ओळखता यावी यासाठी हे बंधन घालण्यात आल्याचे मुंबई महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा – खड्डेमय रस्त्यांमुळे गणेशोत्सवात एसटीचा प्रवास खडतर ; एसटी महामंडळ आवश्यक सामग्रीसह दुरुस्ती पथक तैनात करणार
समुद्र अथवा नैसर्गिक स्रोतांमध्ये प्रदुषण होऊ नये यासाठी पीओपीच्या गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्येच करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या २४ प्रशासकीय विभाग कार्यालयांच्या हद्दीत एकूण १५० कृत्रिम तलाव उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने नियोजन करण्यात येत असल्याची माहिती या अधिकाऱ्याने दिली.