मुंबई : दादर येथील महानगरपालिकेच्या कोहिनूर सार्वजनिक वाहनतळात सोमवारी मध्यरात्री भीषण आग लागली होती. या आगीत १६ चारचाकी आणि दोन दुचाकी जळून खाक झाल्या. मध्यरात्री २.३० च्या सुमारास ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी वाहनांचे मोठे नुकसान झाले. हे वाहनतळ महानगरपालिकेच्या जी-उत्तर विभाग कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर आहे.

दादर पश्चिमेकडील प्लाझा चित्रपटगृहाच्या मागे महानगरपालिकेचे सार्वजनिक वाहनतळ आहे. तीस मजली इमारतीच्या तळघरात तीन मजले आणि वर १३ मजल्यांपर्यंत वाहनतळ आहे. तर त्यावरील १४ ते ३० मजल्यांवर निवासी गाळे आहेत. तळघरातील गाळ्यांपैकी पी चार या मजल्यावर सोमवारी रात्री १२.३० च्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत चार चाकी गाड्या व दुचाकींचे मोठे नुकसान झाले. घटनेचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या गाड्या, पोलीस व महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मध्यरात्री २.३० च्या सुमारास ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले.

हेही वाचा >>>दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन आक्रमक; भेसळयुक्त दूध, मावा, सूर्यफूल आणि पामोलिन तेल जप्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही आग विद्युत यंत्रणेतील बिघाडामुळे लागली असावी अशी शक्यता अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. वाहनतळात गाड्या जवळजवळ उभ्या होत्या. त्यामुळे एका गाडीपाठोपाठ एक अशा गाड्या पेटत गेल्याची शक्यताही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, या दुर्घटनेमुळे महानगरपालिकेच्या वाहनतळामध्ये उभ्या करण्यात येणाऱ्या गाड्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच वाहनमालकांच्या नुकसानाची भरपाई कशी होणार असाही प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत महानगरपालिकेच्या जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यानी प्रतिसाद दिला नाही.