मुंबई : कोकणातील १०५ गावांतील ४४९.९३ चौरस किमी क्षेत्रात १३ विकास केंद्रे अर्थात ग्रोथ सेंटर विकसित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची (एमएसआरडीसी) विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पण आता मात्र राज्य सरकारने लोणेरे, हर्णे, भाट्ये, बांदा, केळवट आणि हरिहरेश्वर अशा सहा नवीन ग्रोथ सेंटरची वाढ केली आहे. त्यामुळे कोकणात १३ ऐवजी १९ ग्रोथ सेंटर विकासित केली जाणार आहेत.
ग्रोथ सेंटरची संख्या वाढवितानाच राज्य सरकारने आधीच्या १३ सेंटरमधील ११ ग्रोथ सेंटरच्या क्षेत्रातही वाढ केली आहे. त्यामुळे १०५ गावांमधील ४४९.९३ चौरस किमीऐवजी ६९९ गावांमधील २९८५ चौरस किमी क्षेत्राचा विकास केला जाणार आहे. या ६९९ गावांच्या विकासासाठी, ग्रोथ सेंटर विकसित करण्यासाठी एमएसआरडीसीची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासंबंधीची अधिसूचना गुरुवारी नगर विकास विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.
मुंबई – कोकण प्रवास अतिवेगवान व्हावा यासाठी एमएसआरडीसी ३८८ किमी लांबीचा कोकण द्रुतगती महामार्ग आणि ४९८ किमीचा रेवस ते रेडी सागरी किनारा मार्ग (कोस्टल रोड) बांधत आहे. या दोन्ही प्रकल्पांच्या आराखड्याचे काम सध्या सुरू आहे. दरम्यान, या दोन्ही प्रकल्पांमुळे लगतच्या परिसरात विकासाच्या अनेक संधी निर्माण होणार आहेत, असा मुद्दा एमएसआरडीसीने उपस्थित केला आहे. त्यामुळे एमएसआरडीसीने या दोन्ही प्रकल्पांलगत १३ ग्रोथ सेंटर विकसित करण्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवला होता.
अधिसूचनेनुसार आता कोकण द्रुतगती महामार्ग आणि सागरी किनारा मार्गालगत १३ ऐवजी १९ ग्रोथ सेंटर विकसित केली जाणार आहेत. वाढवण, केळवा, रोहा, न्हावे, माजगाव, दिघी, देवके, दोडावन, आंबोळगड, नवीन गणपतीपुळे, रेडी, नवीन देवगड, मालवण, लोणेरे, हरिहरेश्वर, केळवट, हर्णे, भाट्ये, बांदा येथे १९ ग्रोथ सेंटर उभारण्यात येणार आहेत.
प्रस्तावास मंजुरी
देशातील सर्वात मोठे बंदर पालघरमधील वाढवण येथे होणार आहे. त्यामुळे वाढवणसह एकूण ११ ग्रोथ सेंटरच्या क्षेत्रात वाढ करावी, अशी मागणी प्रस्तावाद्वारे केली होती. त्याचवेळी कोकणातील अनेक गावांमध्ये विकासाची संधी असल्याचा मुद्दा उपस्थित करीत आणखी सहा ग्रोथ सेंटर वाढविण्याची विनंती करण्यात आली. हा प्रस्ताव अखेर राज्य सरकारने मान्य केला असून यासंबंधी अधिसूचना गुरुवारी प्रसिद्ध केल्याची माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
२९८५ चौरस किमी क्षेत्राचा विकास
ग्रोथ सेंटरची संख्या वाढल्याने आणि प्रस्तावित १३ पैकी ११ ग्रोथ सेंटरच्या क्षेत्रातही वाढ करण्यात आल्याने आता ४४९.९३ चौरस किमीऐवजी २९८५ चौरस किमी क्षेत्राचा विकास केला जाणार आहे. आधी १३ ग्रोथ सेंटरमध्ये केवळ १०५ गावांचा समावेश होता, पण आता नवीन १९ ग्रोथ सेंटरमध्ये एकूण ६९९ गावांचा समावेश असल्याची माहितीही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. या गावांसाठी आता ‘एमएसआरडीसी‘ची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.