मुंबई : कोट्यवधी रुपयांच्या अमली पदार्थांच्या तस्करीतील मुख्य सूत्रधार मोहम्मद सलीम मोहम्मद सुहेल शेख याला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. संयुक्त अरब अमिरात मधून प्रत्यापर्ण करून त्याला भारतात आणण्यात आले आहे. सुहेलने आपल्या साथीदारांमार्फत संपूर्ण भारतात अमली पदार्थ वितरणाचे जाळे तयार केले होते. याप्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत २५६ कोटींचे अमली पदार्थ जप्त केले असून १५ जणांना अटक केली आहे.
प्रकरणाची पार्श्वभूमी
मागील वर्षी १६ फेब्रुवारी २०२४ रोजी गुन्हे शाखा ७ च्या पथकाने कुर्ला येथून परवीन बानो गुलाम शेख नामक एका महिलेला २५ कोटींच्या मेफेड्रॉन (एमडी) अमली पदार्थांसह अटक केली होती. या तपासात अमली पदार्थांच्या साखळीतील एकेक दुवे समोर येऊ लागले होेते परवीनला मिरा रोड येथील साजिद मोहम्मद आसिफ शेख हा अमली पदार्थ पुरवत होता. पोलिसांनी साजिदला अटक केली. साजिदच्या चौकशीत अमली पदार्थाच्या तस्करीतील मुख्य सूत्रधार मोहम्मद सलीम मोहम्मद सुहेल शेख याचे नाव समोर आले होते. साहील दुबईला राहून संपूर्ण भारतात अमली पदार्थांचे जाळे तयार केले होेते.
आंतरराष्ट्रीय साखळी तोडण्यात यश
ही टोळी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मेफेड्र्रॅानचे उत्पादन आणि पुरवठा करत होते. त्यासाठी लागणारा कच्चा माल वेगवेगळ्या राज्यांतून आणला जात होता. पोलिसांनी पुरवठादार आणि वितरक यांच्यातील आर्थिक व्यवहार पार पाडणाऱ्या अंगडिया ऑपरेटरना (पारंपरिक कुरिअर) पोलिसांनी अटक केली होती.
या प्रकरणातील मुख्य सुत्रधार मोहम्मद सलीम मोहम्मद सुहेल शेख दुबईतून सूत्र हलवत होता. त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी झाल्यानंतर शेखला संयुक्त अरब अमिराती (युएई) मध्ये ताब्यात घेण्यात आले आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याला भारतात प्रत्यार्पित करण्यात आले. त्याला २२ ऑक्टोबर रोजी औपचारिक अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला ३० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी यापूर्वीच दुबई मधील आरोपी ताहेर सलीम होला आणि मुस्तफा मोहम्मद कुब्बावाला यांचेही प्रत्यार्पण करून त्यांना अटक केले आहे.
एमडी मधील सर्वात मोठी कारवाई
या प्रकरणात पोलिसांनी एकूण २५२ कोटी २८ लाखांचे १२६.१४ किलो मेफेड्रॉन आणि ३ कोटी ६२ लाख रुपये रोख जप्त केले आहे. जप्त केलेल्या मालमत्तांचे एकूण मूल्य अंदाजे २५६ कोटी ४९ लाख इतके आहे. पोलिसांनी आतापर्यंत सांगली, सुरत आणि मुंबईतील प्रमुख सूत्रधारांसह १४ पुरुष आणि १ महिला अशा एकूण १५ जणांना अटक केली आहे. राज्याच्या इतिहासातील मेफेड्रॉनच्या सर्वात मोठ्या जप्तींपैकी ही एक कारवाई असल्याचे पोलिसांनी सांगितले.
